पुणे: भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू वर्षात रेपो दरात एक टक्का कपात केल्याने कर्जे स्वस्त झाली आहेत. त्यानंतरही एप्रिल ते जून-2025 या तिमाहीत कार, दुचाकी, ट्रकच्या विक्रीत गत वर्षीच्या तुलनेत घट झाली असून, तीनचाकी वाहनांची विक्री स्थिर आहे. तर, एकूण वाहन विक्री 64 लाख 1 हजार 372 वरून 60 लाख 74 हजार 874 वर (5.1 टक्के घट) आली आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (एआयएएम) मंगळवारी तिमाही विक्रीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशांतर्गत विक्रीत घट झाल्याचे दिसून येत आहे. कार, युटिलिटी व्हेईकल (यूव्ही) आणि व्हॅन या प्रवासी चारचाकी वाहनांची तिमाही विक्री 10 लाख 11 हजार 882 वर गेली आहे. (Latest Pune News)
गतवर्षी याच कालावधीत 10 लाख 26 हजार 6 प्रवासी कार रस्त्यावर आल्या होत्या. गतवर्षीपेक्षा प्रवासी कारची विक्री 1.4 टक्क्यांनी घटली आहे. त्यातही कारची विक्री 3 लाख 41 हजार 293 वरून 3 लाख 2 हजार 991 वर (11.2 टक्के घट) घसरली आहे. स्पोर्टलूक असलेल्या यूव्हीकारची विक्री 6 लाख 45 हजार 794 वरून 6 लाख 70 हजार 256 (3.8 टक्के वाढ) गेली आहे. व्हॅनची विक्री 38,919 वरून 38,635 वर आली आहे.
ट्रक, लॉरी, ट्रेलर आणि मोठ्या बस यांसारख्या जडव्यावसायिक वाहनांची विक्री 85,590 वरून 83,639 वर आली आहे. प्रवासी बसची विक्री 17 हजार 9 वरून 18,137 वर गेली आहे. तर, मालवाहतूक ट्रकची विक्री 68,581 वरून 65,502 वर आली आहे.
हलकी प्रवासी आणि मालवाहतूक वाहने 1 लाख 38 हजार 985 वरून 1 लाख 39 हजार 576 वर गेली आहे. त्यात प्रवासी बसची विक्री 15,571 वरून 16,949 आणि लहान ट्रकची विक्री 1 लाख 23 हजार 414 वरून 1 लाख 22 हजार 627 वर गेली आहे. एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री 2 लाख 24 हजार 575 वरून 2 लाख 23 हजार 215 वर आली आहे.
तीनचाकी वाहनांची विक्री 1 लाख 65 हजार 81 वरून 1 लाख 65 हजार 211 वर आली आहे. प्रवासी तीनचाकीची विक्री 1 लाख 33 हजार 608 वरून 1 लाख 35 हजार 871 वर गेली आहे. मालवाहतूक करणार्या तीनचाकींची विक्री 26,847 वरून 25,996 वर घसरली आहे. ई-रिक्षाची विक्री 3,719 वरून 2,593 वर आली आहे.
दुचाकींच्या विक्रीला ब्रेक...
शहरी आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्गीयांचे वाहन म्हणून दुचाकीची ओळख आहे. एकूण वाहन विक्रीत दुचाकींचा वाटा मोठा असतो. एप्रिल ते जून या कालावधीत दुचाकींची विक्री गतवर्षीपेक्षा 49 लाख 85 हजार 631 वरून 46 लाख 74 हजार 562वर घसरली आहे. मोटरसायकलची विक्री 31 लाख 97 हजार 922 वरून 29 लाख 3 हजार 449 वर (9.2 टक्के घट) आली आहे. मोपेडची विक्री 1 लाख 22 हजार 715 वरून 1 लाख 9 हजार 361 वर (10.9 टक्के घट) आली आहे. स्कूटर्सची विक्री 16 लाख 64 हजार 994 वरून 16 लाख 61 हजार 752 वर आली आहे