पुणे

पुणे : भाजी घ्या भाजी… पाच रुपये गड्डी!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत पालेभाज्यांच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, त्यानंतर आलेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. बाजारात दर्जाहीन पालेभाज्या मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, त्याच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याने पालेभाज्यांचे भाव कोसळले आहेत. किरकोळ बाजारात गड्डीचे भाव पाच ते दहा रुपयांवर पोहचले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात पुणे जिल्ह्यातून पालेभाज्यांची आवक होत आहे. मागील आठवडाभरापासून कोथिंबिरीच्या दररोज दोन लाख जुडी, तर मेथीच्या 80 हजार जुड्यांची आवक होत आहे. एरवी कोथिंबिरीची आवक एक लाख, तर मेथीची 40 हजार जुडी इतकी असतो. सद्य:स्थितीत त्यामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. तर, यामध्ये बहुतांश पालेभाज्यांना पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे त्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे.

घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला 1 ते 5 रुपये भाव मिळत आहे, तर मेथीला 3 ते 7 रुपये भाव मिळत आहे. पालकही 6 ते 8 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर, किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या गड्डीचे भाव पाच ते दहा रुपये गड्डींवर आले आहे. दर्जाहीन भाज्या खरेदी करण्याकडे पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पालेभाज्यांचे विक्रेते सचिन कुलट यांनी सांगितले. शहरात बहुतांश ठिकाणी रस्त्यांवर कोथिंबिरीची दहा रुपयांना तीन गड्ड्यांची विक्री सुरू आहे.

पाऊस सुरू झाल्यानंतर झालेल्या लागवडीमुळे पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. पंधरा दिवसांत तुलनेत आता दुप्पट आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी नसल्यामुळे पालेभाज्यांचे भाव घसरले आहेत. विशेषत: कोथिंबिरीला तर कवडीमोल भाव मिळत आहे.

– राजेंद्र सूर्यवंशी,
व्यापारी, मार्केट यार्ड

पावसामुळे भिजलेल्या आणि हलक्या दर्जाच्या पालेभाज्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. हलक्या दर्जाच्या मालाला उठाव नाहीच. मात्र, दर्जेदार मालालाही नेहमीच्या तुलनेत खूपच कमी मागणी आहे.

– संजूकुमार अपाचे,
पालेभाजी विक्रेते, हडपसर

हेही वाचा

SCROLL FOR NEXT