परिंचे : वीर (ता. पुरंदर) येथील सौरभ वाघ यास मारहाण आणि धिंड काढल्याप्रकरणी सासवड पोलिसांनी सुरुवातीस काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, नुकत्याच नोंदविलेल्या पुरवणी जबाबात आणखी काही आरोपींची नावे पुढे आली आहेत. यामध्ये वीर ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच यांचे पती आणि श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष, त्यांचे चुलत बंधू आणि अन्य व्यक्तींचा समावेश असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Latest News)
सौरभ वाघ याच्या फिर्यादीनुसार, एका स्थानिक हॉटेलमधील बिलावरून वाद निर्माण होऊन त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची इंदिरानगरपासून उमाजी नाईक चौकापर्यंत धिंड काढण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. सुरुवातीला दबावामुळे काही निवडक व्यक्तींचीच नावे दिल्याचे वाघने स्पष्ट केले असून, सीसीटीव्ही फुटेज व सामाजिक आधार मिळाल्यानंतर त्याने सासवड पोलिस ठाण्यात पुरवणी जबाब नोंदविला. या नव्या जबाबाच्या आधारे सासवड पोलिसांनी वीर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मंजूषा धुमाळ यांचे पती आणि श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष संतोष धुमाळ, त्यांचे चुलत बंधू ऋषिकेश बाळासाहेब धुमाळ, अजित विठ्ठल चव्हाण, रूपेश रतन धुमाळ, गणेश बाबूराव धुमाळ, मंगेश महादेव धुमाळ, गणेश विद्याधर धुमाळ, रोहन संजय धुमाळ, योगेश चंद्रकांत धुमाळ आणि अन्य 10 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी अॅड. मंगेश ससाणे यांनी पीडित वाघची भेट घेतली. अॅड. ससाणे यांनी सांगितले, या गंभीर प्रकरणात भारतीय दंडविधानातील कलम 196 सारख्या कठोर कलमांचा समावेश होणे गरजेचे आहे. आरोपींना नोटीस देऊन त्यांना मोकाट ठेवले जात आहे. अशामुळे पीडित युवकावर तडजोडीसाठी दबाव टाकला जात आहे. आम्ही यासंदर्भात गृह मंत्रालयाकडे निवेदन देणार आहोत.’ पीडित युवक वाघने स्पष्ट केले की, ’सुरुवातीला प्रचंड मानसिक दबाव होता. त्यामुळे मी मोजक्या आरोपींचीच नावे दिली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज व समाजातून मिळालेल्या आधारानंतर मी उर्वरित आरोपींची नावे पुरवणी जबाबात दिली आहेत. माझ्यावर तडजोडीसाठी अनेक माध्यमांतून दबाव येत असून, मला न्याय मिळावा, अशी मी अपेक्षा करतो. या प्रकरणाचा तपास सासवड पोलिस करीत असून, कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.