Veena Ghosh Corporator Pune Pudhari
पुणे

Veena Ghosh Corporator Pune: घर सांभाळले तसाच प्रभागही सांभाळेन – नवनिर्वाचित नगरसेविका वीणा घोष

पतीच्या 30 वर्षांच्या संघर्षाचे फळ; राष्ट्रवादीच्या दिग्गज उमेदवारावर मात

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत चांगली मते मिळूनही मला पराभूत व्हावे लागले. मात्र, माझे पती गणेश यांच्या 30 वर्षांच्या राजकीय संघर्षात त्यांनी आत्तापर्यंत पेरलेल्या सकारात्मक कार्याचा उपयोग मला या निवडणुकीत झाला आणि हेच माझ्या विजयाचे प्रमुख कारण आहे, असे मत नवनिर्वाचित नगरसेविका वीणा घोष यांनी ‌‘पुढारी‌’शी दिलखुलास गप्पा मारताना व्यक्त केले.

मी जसे घर नीटनेटके सांभाळते, तसाच माझा प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका करणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. शहरातील प्रभाग क्रमांक 36 ‌‘अ‌’ गटातून वीणा गणेश घोष ह्या निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार सुभाष जगताप यांचा पराभव करीत त्यांनी विजयश्री खेचून आणली. आपल्या राजकीय प्रवासाबद्दल ‌‘पुढारी‌’च्या संपादकीय विभागाशी गप्पा मारताना त्या म्हणाल्या, ‌‘माझे वडील लष्कराच्या दारूगोळा कारखान्यात कामाला होते, तर आई घरोघरी स्वयंपाकाचे काम करायची. दहा बाय दहाच्या खोलीत मी लहानाची मोठी झाले. मी महापालिकेच्या शाळेत शिकले. गणेश घोष यांच्याशी 2005 मध्ये लग्न झाल्यावर माझे जीवनच बदलले. कारण, ते राजकीय पार्श्वभूमीचे, संघविचारांचे. त्यामुळे मी त्यांचे काम फक्त पाहत होते. निवडणूक लढायची नाही, हे ठरविले होते. मात्र, 2012 मध्ये पक्षाने सांगितल्याने मला उभे राहावे लागले. त्या वेळी चांगली मते मिळाली; पण मी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. गणेश यांचा राजकीय संघर्ष 30 वर्षांचा आहे. त्यांनी आजवर जे सकारात्मक पेरले, त्याचा फायदा मला या निवडणुकीत झाला.‌’

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. त्या मला भेटल्यावर आवर्जून चौकशी करतात. निवडणुकीला मी उभे राहायला तयार नव्हते. कारण, घरची जबाबदारी हेच माझे लक्ष्य होते. पण, प्रभागातील गट हा महिला आरक्षित झाल्याने गणेश यांच्याऐवजी मलाच उभे राहावे लागले. त्या वेळी माधुरीताई हसून म्हणाल्या, ‌‘उभे राहायचे नाही, असे म्हणायचे नाही. येशील तू निवडून. मला विश्वास आहे.‌’ त्यामुळे मी आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे गेले. समोर कोण आहे? याचा विचार केला नाही, कुठली भीती बाळगली नव्हती. त्यामुळे विजय सुकर झाला.

कमिशन किंवा रिंग हा प्रकार कधीच आवडला नाही!

वीणा घोष यांनी प्रभागात अनेक कामे करण्याचा संकल्प बोलून दाखविला. खास करून 23 वस्त्यांमधील गरीब नागरिकांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काम करायचे असून, चांगली शाळा, चांगले रस्ते, महिलांसाठी दर्जेदार सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणार आहे. कमिशन किंवा रिंग हा प्रकार कधीही आवडला नाही आणि कधीही करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT