वरवंड-पारगाव गटात महिला आरक्षण; वरवंड-पारगाव गटात सख्ख्या जावा उतरणार मैदानात? Pudhari
पुणे

Varwand Pargav Women Reservation Elections: वरवंड-पारगाव गटात महिला आरक्षण; वरवंड-पारगाव गटात सख्ख्या जावा उतरणार मैदानात?

एकाच घरातील दोन सख्ख्या जावा समोरासमोर; तालुक्यात रंगणार राजकीय चुरशी

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर : दौंड तालुक्यातील वरवंड-पारगाव जिल्हा परिषद गटात येणाऱ्या निवडणुकीत रंगतदार आणि अत्यंत लक्षवेधी लढत रंगणार असल्याचे संकेत आहेत. या गटासाठी यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने महिला उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, या गटात एकाच घरातील सख्ख्या जावा समोरासमोर उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे, हे नक्की.(Latest Pune News)

या गटातून आमदार राहुल कुल यांचा गट राजकीय दृष्ट्‌‍या मजबूत मानला जातो. आ. कुल यांच्या गटामधून जयश्री ज्ञानेश्वर दिवेकर ह्या सन 2012-17 मध्ये येथून विजयी झाल्या होत्या. या वेळी त्या पुन्हा मैदानात उतरण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दौंड तालुका महिला अध्यक्षा योगिनी विजयकुमार दिवेकर ह्या देखील त्यांच्या पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून आपली तयारी करीत आहेत. दोघीही एकाच घरातील सख्ख्या जावा असल्याने ही लढत केवळ राजकीय नसून कौटुंबिक स्तरावर देखील प्रतिष्ठेची ठरणार आहे.

पक्षनिहाय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या गटातील राजकीय रणधुमाळीला आणखी वेग येणार आहे. मतदारसंघात घराघरांतून चर्चा सुरू झाली असून, ‌’कोण करेल मात?‌’ हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, या लढतीत केवळ महिलाच नव्हे, तर संपूर्ण गावाचे लक्ष या दोन उमेदवार जावांवर केंद्रित राहणार आहे. आगामी काही दिवसांत प्रचार मोहिमेला वेग येईल आणि गावात महिला सत्तेची ही ‌’जाऊ विरुद्ध जाऊ‌’ अशी लढत निश्चितच राजकीय रंगत वाढवणारी ठरेल, यात शंका नाही.तालुक्याच्या राजकीय समीकरणांवर होणार परिणाम

या गटात महिला आरक्षण लागू झाल्याने इतर काही महिला इच्छुकांनी देखील हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, प्रमुख लढत ‌’जाऊ विरुद्ध जाऊ‌’ अशी होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन्ही कुटुंबीय राजकारणात सक्रिय असल्याने या निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिकच नव्हे, तर तालुक्याच्या राजकीय समीकरणांवर देखील परिणाम करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT