पुणे

जेजुरी, राम मंदिराचे आकर्षण अशा नानाविध गणेशमूर्ती पुण्यात दाखल

अमृता चौगुले

पुणे : खंडेरायाची जेजुरी, अयोध्येतील राम मंदिर, कामधेनू अन् डोंगरात अवतरलेली एकवीरादेवी, अशा नानाविध प्रभावळी असलेल्या गणेशमूर्ती शहरात दाखल झाल्या आहेत. दरवर्षी नावीन्यपूर्ण मूर्ती घडविणार्‍या मूर्तिकारांनी यंदा प्रभावळीकडे जास्त लक्ष दिले आहे. त्यामुळे मूर्तींतील ट्रेंड यंदा प्रभावळींमधून दिसू लागला आहे. गणरायाच्या आगमनाचे वेध लागताच गणेशभक्तांकडून मूर्तीची आगाऊ नोंदणी करण्यास सुरुवात होते. त्यानुसार भक्त परिसरातील विविध ठिकाणी गणेशमूर्ती स्टॉलला भेटी देऊन पसंतीनुसार मूर्तीची बुकिंग करतात. यामध्ये बैठ्या मूर्तींना पुणेकरांकडून विशेष पसंती दिली जाते.

बाप्पांमध्ये आपल्या कुलदेवतांसह धार्मिक स्थळांची छबी दिसावी, यासाठी भाविक प्रयत्नशील असतात. त्यानुषंगाने मूर्तीची खरेदी करण्यात येते. मात्र, खंडेरायाच्या रूपातील गणपती हा घोड्यावर लढण्याच्या तयारीतील येतो तसेच रामरूपी मूर्ती उभी असते. शास्त्रानुसार बैठ्या मूर्तींची स्थापना करण्यास सांगण्यात येत असल्याने इच्छा असूनही भक्तांना या मूर्ती खरेदी करता येत नाहीत. गणेशभक्तांची ही गरज ओळखून यंदा मूर्तिकारांनी प्रभावळींमधून कुलदैवतेसह धार्मिक स्थळांचे दर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे.

शहरात अडीच फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींना विविध देवस्थानांसह देवांच्या मूर्तींच्या प्रभावळींनी सजविण्यात आले आहे. या मूर्ती अकरा हजारांपासून उपलब्ध आहेत. बहुतांश मूर्ती बाजारात दाखल झाल्या असून, काही मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मूर्तींची आखणी झाली असून, आता सोनेरी रंग चढविण्यात येत आहे. आकर्षक प्रभावळी असलेल्या या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शनिवार पेठेतील मूर्तिकार ओंकार काळे यांनी दिली.

प्रभावळ हा सजावटीचा भाग आहे. गणेशमूर्तीच्या बाजूला देखावे, विविध देवतांच्या मूर्ती, पौराणिक प्रसंग साकारण्यात आले आहेत. गणेशमूर्ती कोणत्या अवतारात आहे, तिची बैठक कशी आहे, याचा विचार करून प्रभावळ तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही प्रभावळी या कायमस्वरूपाच्या, तर काही मूर्तीपासून वेगळ्या करता येतात आणि पुन्हा वापरता येतात.

– गणेश कुंभार, मूर्तिकार, लोहगाव

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT