भोर : भोर-वरंध घाट अतिवृष्टी तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे 30 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनासाठी घाट बंद राहणार आहे. हवामान खात्याच्या रेड अलर्ट, आँरेज अलर्ट काळात हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार असल्याने वाहन चालक व प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले.
वरंध घाटातून पुण्याहून भोर मार्गे महाडला जाता येते. घाटातील सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील तीन महिने बंद असणार आहे. हवामान खात्याचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश पुणे जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहेत.
पावसाळ्यात घाटात अतिवृष्टी होते. त्यामुळे दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटना घडतात. त्यातच सध्या वरंध घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे कामं प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने घाट तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे आणि कोकणला जोडणारा हा प्रमुख घाटमार्ग म्हणून वरंध घाट ओळखला जातो. वरंध घाट हा जवळपास 10 किमी इतका आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात आणखी वाढते. धबधबे, तलाव आणि घनदाट जंगल असणार्या या घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असते. यामुळे घाट बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.