येरवडा : येरवडा परिसरातील जय जवाननगर येथे ड्रेनेज लाइन तुंबल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी साचत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अमृतेश्वर गणेश मंदिर परिसरात देखील सांडपाणी साचत असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात या भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रस्त सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
जय जवाननगर येथून ड्रेनेज लाइन पुढे अमृतेश्वर गणेश मंदिर, झेंडा चौकाच्या दिशेने वळविण्यात आली आहे. हा भाग उतारावर आहे, तर पुढे झेंडा चौक परिसर उंचावर असल्याने ड्रेनेज लाइनमधील पाणी पुढे जात नाही. पाऊस झाल्यानंतर आजूबाजूच्या भागांतील पाणी या ठिकाणी वाहून येत असल्याने ड्रेनेज लाइन तुंबत आहे. पावसाच्या पाण्याचा या ठिकाणी निचरा होत नाही. महापालिकेच्या अधिकार्यांनी गेल्या काळात अनेक वेळा या समस्येची पाहणी केली आहे. तरीही पाण्याचा निचारा होण्यासाठी उपाययोजना झाल्या नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाइनचे दुर्गंधीयुक्त पाणी साचतून राहात असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठ्या प्रमाणात सांडपाण्यामुळे या ठिकाणी जीवन जगणे कठीण झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी दै. ’पुढारी’ शी बोलताना सांगितले.