वाल्हे: मागील महिन्यापासून आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाई दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका ग््राामीण भागातील जनतेला बसत आहे. मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भरमसाट वाढ झालेली आहे. या महागाईच्या झळांनी सर्वसामान्यांचा जीव अगदी मेटाकुटीला आला आहे.
त्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. घरातील जेवणालाही महागाईची फोडणी बसली आहे. मागील महिन्यांपासून खाद्यतेल, डाळींच्या किमतीचा वाढता आलेख आहे. जानेवारी महिन्यात 2 हजार 100 रुपयांना मिळणारे सूर्यफूल तेल डबा आता 2 हजार 690 रुपयाला मिळत आहे. सोयाबीन, शेंगदाणा तेलाचीही अशीच दरवाढ झालेली आहे. याच्या किमतीतही वाढ झालेली आहे. धान्य, डाळींच्या किमतीही वाढलेल्या आहेत. यामुळे गरीबाघरी अन्नाचा घासही कडू वाटू लागला आहे.
दैनंदिन खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मिसळचा दर 70 रुपयांवरून 80 रुपये; तर वडापाव 15 रुपयांवरून 22 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय, पोहे 25 रुपयांवरून 30 रुपये, भजी 40 रुपयांवरून 45 रुपये, समोसा 15 रुपयांवरून 20 रुपये, भेळ 50 रुपयांवरून 70 रुपयांपर्यंत वाढली आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या मते, केवळ गॅस किंवा तेलच नव्हे, तर भाजीपाला, मसाले आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे, तसेच वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे दरवाढ करणे ही त्यांच्यासाठी अपरिहार्य बाब बनली आहे.
गॅस सिलिंडरटंचाईने ग््राामीण यात्रांवर विरजण
आखाती देशांतील वाढत्या तणावामुळे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरपुरवठा विस्कळीत झाल्याने सध्या सुरू असलेल्या यात्रा-जत्रांवर टंचाईचे सावट आले आहे. ग््राामीण भागात सध्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू असून, बाहेरगावी स्थायिक नागरिक गावाकडे परतत आहेत. या काळात पारंपरिक पद्धतीने नातेवाईक व मित्रपरिवारासाठी जेवणावळी आयोजित केल्या जातात. मात्र, यंदा गॅसटंचाईमुळे या आयोजनात अडथळे निर्माण होत आहेत. वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग््राामदैवत श्री भैरवनाथ यात्रेला बुधवार (दि. 8) पासून सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरात गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. गॅसवितरणाच्या गाड्याच न आल्याने ग््राामस्थांसमोर संकट उभे राहिलेे.
यात्रेनिमित्त पर्याय नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. वर्षातून एकदाच येणाऱ्या यात्रेचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न ग््राामस्थांना पडला आहे. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकांनाही या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. गॅस उपलब्ध नसल्याने काहींना हॉटेल बंद ठेवावी लागत आहेत, तर काहींनी मर्यादित पदार्थांसह व्यवसाय सुरू ठेवला आहे. अनेकांनी चुलीवर स्वयंपाक सुरू करून परिस्थितीशी सामना करण्याचा प्रयत्न केला आहे.
गॅससोबतच तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढवावे लागत आहेत. यातच गॅस वेळेवर मिळत नसल्याने चुलीचा वापर करावा लागत आहे.सुरेखा दुर्गाडे, हॉटेल व्यावसायिक, वाल्हे