मंचर: घोडेगाव (ता. आंबेगाव) शहरातील व्यापार्यांना व्यवसायवृद्धीसाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, यासाठी पंचायत समितीच्या जागेत व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली.
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत घोडेगावमधील प्रलंबित प्रश्न व नवीन कामांबाबत चर्चा झाली. या वेळी वळसे पाटील बोलत होते. (Latest Pune News)
वळसे पाटील म्हणाले, ’घोडेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून येथे सातत्याने वर्दळ असते. भीमाशंकरला जाणारे पर्यटकही या शहरातून जातात. त्यामुळे व्यापार वाढीस संधी असून पंचायत समितीच्या जागेत व्यापारी संकुल उभारल्यास स्थानिक व्यापार्यांना मोठा फायदा होईल. या जागेत सध्या असलेले ग्रामीण रुग्णालय लवकरच नवीन ठिकाणी स्थलांतरित होणार असून त्यानंतर संकुलाचे काम हाती घेण्यात येईल.’
तसेच घोडेगावमधील कचर्याचा प्रश्नही गंभीर असून त्यासाठी खाजगी कंपनीमार्फत विल्हेवाट लावण्याची सूचना वळसे पाटील यांनी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
घोडेगाव नगरपंचायतीची मागणी
ग्रामसभेत घोडेगावसाठी नगरपंचायत स्थापनेची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यावर ग्रामस्थांची इच्छा असल्यास नगरपंचायत स्थापन केली जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच महसूल भवनच्या जागेत अभ्यासिका सुरू करावी, जुन्नर फाटा ते चिंचोली आणि मंचर ते घोडेगाव रस्त्याचे रुंदीकरण आणि शहरालगतच्या दोन्ही ओढ्यांना संरक्षक भिंती व स्वच्छतेची कामे करण्याबाबतच्या सूचनाही वळसे पाटील यांनी संबंधितांना दिल्या.