माऊली शिंदे
वडगाव शेरी: येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जलतरण तलावाच्या कामाचे भूमिपूजन पाच वर्षांपूर्वी केले होते. परंतु, पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने या जलतरण तलावाचे काम अद्यापही रखडलेच आहे. परिसरात राडारोडा आणि कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
वडगाव शेरी परिसरातील नागरिकांसाठी जलतरण तलाव आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली होती. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जीम आणि जलतरण तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पाच वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीतून तलावाच्या टाकीचे काही प्रमाणात काम करण्यात आले. पण, त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे या कामाला बेक लागला. निधी उपलब्ध होत नसल्याने परिसरातील मोकळ्या जागेत कचरा आणि राडारोडा टाकला जात आहे.
तलावाच्या टाकीचे काम देखील अपूर्ण असून, त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जलतरण तलावाच्या आवारात बांधकाम साहित्य टाकण्यात आले असून, नियमित साफसफाई होत नसल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. प्रवेशद्वाराच्या आतील व बाहेरील भागात कचरा साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात महापालिकेचा जलतरण तलाव नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, या कामाच्या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला असून, परिसराला ‘ओपन बार’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. मद्यपींचा उपद्रव सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिका प्रशासनाचे हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
जलतरण तलावाअभावी नागरिकांची गैरसोय
वडगाव शेरीमध्ये जलतरण तलावाची गरज आहे. जलतरण तलावाचे काम रखडल्याने नागरिकांनी येरवडा किंवा खराडी येथे महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी जावे लागत आहे. वडगाव शेरीमध्ये खासगी जलतरण तलाव आहेत. पण, त्याचे शुल्क नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. यामुळे महापालिकेने या जलतरण तलावाचे काम तत्काळ पूर्ण गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
कोरोना काळात जलतरण तलाव आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, निधीअभावी हे काम रखडले. या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल.योगेश मुळीक, नगरसेवक
गेल्या काळात जलतरण तलावाचे काम निधीअभावी रखडले होते. परंतु यंदाच्या बजेटमध्ये या कामासाठी 1.5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे काम लवकरात काम सुरू करून येत्या दोन ते अडीच वर्षांमध्ये ते पूर्ण केले जाईल. संरक्षक भिंतींच्या कामाला प्राधान्य दिले जाईल.हनुमंत कलाटे, उपअभियंता, महापालिका