Gold Theft File Photo
पुणे

Vadgaon Nimbalkar Robbery Gang: पत्ता विचारण्याचा बहाणा; महिलेच्या गळ्यातील दागिने लुटले!

सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक, ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

बारामती: वडगाव निंबाळकर पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासात चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व दोन दुचाकी असा एकूण ११ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज मिथुन शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा), सनी रमण भोसले (रा. सांगवी, ता. फलटण), बापूराव भानुदास चोपडे (रा. राजाळे, ता. फलटण) व चोरीचा माल विकत घेणारा सराफ प्रवीण ज्ञानेश्वर वेदपाठक (रा. मारवाड पेठ, फलटण) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील पवन सॅण्डल काळे (रा. मांगोबामाळ, विडणी, ता. फलटण) हा आरोपी अद्याप फरार आहे.

बारामती तालुक्यात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कानाडवाडी येथे शेतात काम करणाऱ्या स्वाती हनुमंत टकले या महिलेकडे पत्ता विचारण्याचा बहाणा करत तिच्या गळ्याला जखम करत गळ्यातील सहा ग्रॅमचे मनी व डोरले चोरीला गेले होते.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. गोपनीय व तांत्रिक माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राज, सनी व पवन या सराईतांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. कानाडवाडीतील चोरीसह अन्य ठिकाणी केलेल्या चोऱ्यातील या तिघांनी चोपडे याच्याकडे दिले. चोपडे याने ते वेदपाठक याला विकले. त्यामुळे या दोघांनाही अटक केली गेली.

पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल, अप्पर अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, ह्रदयनाथ देवकर, सुरज धोत्रे, भाऊसाहेब मारकड यांनी ही कामगिरी केली.

तब्बल दहा गुन्हे उघडकीस

राज, सनी व पवन यांनी पुणे जिल्ह्यात यवत, जेजुरी, बारामती शहर, वालचंदनगर, वडगाव निंबाळकर तर सातारा जिल्ह्यात फलटण शहर पोलिस ठाणे हद्दीत तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ११ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT