मंचर : आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग-शिंदेवस्ती येथील वाळुंजमळा परिसरात अनेक दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या मादी बिबट्याला वन विभागाने बुधवारी (दि. 12) जेरबंद केले. पकडलेली मादी बिबट्या सुमारे दीड वर्षांची आहे, अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र आधिकारी विकास भोसले यांनी दिली.(Latest Pune News)
या मोहिमेत वनपाल महेश मेरगेंवाड आणि वनरक्षक आदर्श जगताप यांनी विशेष सहभाग घेतला. या कारवाईत स्थानिक ग््राामस्थ प्रशांत वाळुंज, किरण शिंदे, वैभव पोखरकर, नीलेश पिंगळे, अनिल मानकर, योगेश पिंगळे, भीमराव मंडले, केतन शिरतर, बाबू शिंदे, संदीप दैने आणि प्रकाश शिंदे यांनी सहकार्य केले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. तसेच काही मेंढ्या आणि जनावरांवरही हल्ले झाले होते. अखेर वन विभागाच्या सततच्या प्रयत्नानंतर बिबट्या पकडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक-हिंगेवस्ती-पहाडदरा रस्त्यालगच्या मोठ्या दगडावर एक बिबट्या ऐटीत बसलेला दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा प्रसंग पाहणाऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचे छायाचित्र कैद केले आहे. त्यामुळे पहाडदरा घाटात वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ यांनी केली आहे.
धामणीमार्गे पहाडदरा हे अंतर साधारण 12 ते 15 किलोमीटर आहे, तर अवसरी बुद्रुक-हिंगेवस्तीमार्गे केवळ 5 ते 6 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे या मार्गावरून पहाडदरा, लोणी, धामणी व शिरदाळे भागातील विद्यार्थी आणि ग््राामस्थ दररोज ये-जा करतात. याचबरोबर परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटकही मोठ्या संख्येने येथे भेट देतात.
घाटाचा दोन किलोमीटर परिसर घनदाट झाडी आणि पाणथळ तळ्यांनी भरलेला असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. अवसरी बुद्रुक येथील सिद्धेश हिंगे पाटील व त्यांच्या मित्रमंडळींनी रात्री उशिरा प्रवास करीत असताना एका मोठ्या दगडावर ऐटीत बसलेल्या बिबट्याचे छायाचित्र, तर थोड्याच अंतरावर फिरणाऱ्या दुसऱ्या बिबट्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान, या परिसरातील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले आणि उद्योजक प्रमोद वाघ यांनी केले आहे.