पुणे : गुन्हेगारी कृत्यासाठी शहरात मागील दोन वर्षांत वापरण्यात आलेली बहुतांश पिस्तुले (गावठी कट्टे) मेक इन यूएसए म्हणजेच उमरटी शिकलगार आर्म्स येथे तयार झालेली असल्याचे समोर आले आहे. त्याच पिस्तुलातून पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांनी रक्तचरित्र रेखाटल्याचे दिसून येते. त्यामुळे पुणे पोलिसांनी ही पिस्तुले तयार करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट उमरटी गावात घुसून कारवाई केली आहे. हे गाव पुणे शहरापासून 500 किलोमीटरवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहे. येथे घरोघरी शस्त्रनिर्मितीची युनिट्स आहेत.
उमरटी हे मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील एका डोंगराळ भागातील गाव आहे. येथून महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतही पिस्तुलाचा पुरवठा केला जातो. ही शस्त्रे जळगाव, धुळेमार्गे महाराष्ट्रात येतात. या पिस्तुलांची तस्करी करणाऱ्यांची एक विशिष्ट साखळी देखील आहे.
कारागृहात दाखल झालेल्या तरुण गुन्हेगारांना कारागृहातील इतर गुन्हेगारांकडून उमरटी गावातील शस्त्रनिर्मितीची माहिती मिळते. यानंतर ते ओळखीतून एक दोनचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. ते कोणत्याही कारवाईत सापडले नाही, तर उमरटी येथील गावांत त्यांना सहज प्रवेश मिळतो. यानंतर ते इंटरनेट कॉलिंगद्वारेे शस्त्रांची ऑर्डर देतात. शस्त्र आणण्यासाठी ते दुचाकीवरून जातात. जेणेकरून रस्त्यात नाकाबंदी असेल, तर सहज मार्ग बदलून पळ काढता येतो.
पुणे शहरात मागील दोन ते तीन वर्षांत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यांचा तसेच गोळीबाराच्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी वापरलेली शस्त्रे ‘मेड इन यूएसए’ असतील तर त्याची चौकशी केली जाणार आहे. या गुन्ह्यांना उमरटीत शस्त्रनिर्मिती करणाऱ्यांनाही आरोपी केले जाण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांत गुन्हेगारांकडे सापडलेल्या शस्त्रांवर ‘यूएसए’ असा शिक्का होता. त्याच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता, उमरटी येथील अवैध शस्त्र कारखान्याची माहिती मिळाली. या गावात मोठ्या प्रमाणात शस्त्र निर्मिती होत असल्याने पोलिसांनी तब्बल तीन आठवडे तयारी केली. गावातून बाहेर पडण्याच्या वाटा शोधून ठेवल्या. तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. त्यानंतरच छापा टाकला. छाप्याच्या वेळी गावाने एकत्र येऊन पोलिस पथकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शीघ कृती दल, अश्रुधूर पथक आणि मध्य प्रदेश एटीएसचे पथक असल्याने काही गडबड झाली नाही.
उमरटी गाव मागील दोन-चार वर्षांपासून अवैध शस्त्रनिर्मितीसाठी चर्चेत आले आहे. येथे विशिष्ट प्रकारचे बॅरल, पाईप, मॅगझीन स्प्रिंग आदी साहित्य आणले जात होते. या साहित्यापासून ऑर्डर मिळेल तशी शस्त्रनिर्मिती केली जात होती. लेथ मशिनवर तसेच हाताने घासून शस्त्र बनवले जात होते. ऑर्डर देताच पाच ते सहा तासांत शस्त्र तयार होऊन हातात दिले जात होते. यामुळे महाराष्ट्रातील शस्त्र तस्करांच्या आणि गुन्हेगारांच्या वाऱ्या उमरटीत वाढल्याचे दिसून आले आहे.