उरुळी कांचन: दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी शाळेत गेलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही मुलगी उरुळी कांचन येथील एका विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती. तिला बुधवारी (दि. 18) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पेपरसाठी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय परीक्षा केंद्रावर वडिलांनी दुचाकीवरून सोडले होते. मुलीला गेटवर सोडून ते घरी परतले. मात्र, दुपारी साडेबारा वाजता एका शिक्षकाने वडिलांना फोन करून ‘तुमची मुलगी परीक्षेला आली नाही’ असे कळविले.
मुलीच्या वडिलांनी तातडीने शाळेत धाव घेऊन शिक्षकांशी चर्चा केली. ‘सकाळी तिला गेटवर सोडले होते,’ असे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष वर्गात ती परीक्षेसाठी बसलीच नव्हती. नातेवाईक आणि शिक्षकांनी शाळेच्या परिसरासह उरुळी कांचनमध्ये सर्वत्र शोध घेतला; परंतु मुलगी मिळून आली नाही. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही अज्ञाताने तिला अज्ञात कारणावरून पळवून नेले असावे, असा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.