नारायणगाव: मे महिन्यात झालेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः डिंगोरे येथील दोन शेतकर्यांच्या मिरची आणि फ्लॉवर पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाकडून मात्र अद्याप पंचनामेही झालेले नाहीत, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
डिंगोरे येथील आमले मळ्यातील जितेंद्र आमले या शेतकर्याच्या सात एकर क्षेत्रातील सिमला मिरची पूर्णपणे खराब झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या या मिरचीसाठी सुमारे सात लाख रुपये खर्च आला होता. (Latest Pune News)
यात मिरचीची रोपे (1.40 लाख), शेणखत, रासायनिक खते, मल्चिंग पेपर (80 हजार), ड्रीप (60 हजार) आणि औषधे (2 लाखांपेक्षा जास्त) यांचा समावेश होता. मात्र, अतिवृष्टीमुळे मिरचिच्या मुळ्या कुजल्या, पाने वाकडी झाली, करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढला, ज्यामुळे झाडे वाळून गेली. त्यामुळे या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याशिवाय पर्याय नसल्याचे जितेंद्र आमले यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत ते आपल्या सात एकर मिरचीवर रोटर फिरवणार आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जितेंद्र यांच्या बाजूला असलेल्या अमोल आमले या शेतकर्याचेही दीड एकर फ्लॉवरचे पीक याच पावसामुळे पूर्णपणे वाया गेले आहे. मार्च अखेरीस लागवड केलेल्या या फ्लॉवरचे पीक पाण्याखाली गेल्याने ’घाण्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि फ्लॉवरचे कांदे सडले. यामुळे अमोल आमले यांनी हताश होऊन उभ्या फ्लॉवर पिकावर ट्रॅक्टर रोटर फिरवला. त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या दोन्ही शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असतानाही, महसूल किंवा कृषी विभागाकडून अद्याप पंचनामे झालेले नाहीत, अशी नाराजी दोन्ही शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे आपले मोठे नुकसान झाले असून, शेतकर्याला कोणी वाली नाही, अशी भावना त्यांनी दै. ’पुढारी’ जवळ बोलताना व्यक्त केली.