Unseasonal Rain Crop Damage Pudhari
पुणे

Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा; इंदापूर-आंबेगावातील पिकांचे मोठे नुकसान

कांदा, गहू, द्राक्ष-बागांना फटका; काढणीच्या तोंडावर शेतकरी संकटात, उत्पादनावर परिणामाची भीती

पुढारी वृत्तसेवा

बावडा : इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरात गुरुवारी (दि. 19) सायंकाळी पावणेसहा वाजता अर्धा तास अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतातील रब्बी पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.

बावडा, कचरेवाडी (बा.), निरनिमगाव, भोडणी, लाखेवाडी, शेटफळ हवेली गावात जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. सध्या काढणी चालू असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान झाले. तसेच, डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी आदी फळबागांनाही या गारपिटीचा फटका बसला आहे.

द्राक्षबागांनाही फटका बसून द्राक्षांना तडे जाऊन मणी गळती झाली आहे, असे फळ उत्पादक शेतकरी ज्योती घोगरे बावडा यांनी सांगितले. तसेच शेतातील चारा पिकांची वादळी वाऱ्याने जमिनीवर लोळून हानी झाली आहे. शिवाय, आंबा पिकाची मोठ्या प्रमाणावरती फळगळ झाल्याचे शेतकरी कुंडलिक अनपट लाखेवाडी यांनी सांगितले.

पारगाव :

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील कांदा काढणीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. बुधवारी (दि. 18) अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामान निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा शेतामध्ये उघड्यावर पडून असल्याने अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लगबगीने त्या कांद्यावर प्लास्टिक कागद टाकून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांदा आणि गहू या पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या ही दोन्ही पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. कांद्याची काढणी सुरू असून, अनेक शेतकरी शेतातून कांदा उपटून वाळविण्यासाठी मोकळ्या जागेत साठवून ठेवत आहेत. अशा वेळी अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कांदा पिकासाठी काढणीनंतरचे हवामान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काढलेला कांदा काही काळ उन्हात वाळवणे आवश्यक असते; मात्र याच काळात पाऊस झाल्यास कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती असते. कांदा ओला झाल्यास तो कुजणे, काळपट पडणे, वजन घटणे तसेच बाजारभावात घसरण होणे अशा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आधीच उत्पादन खर्चाचा बोजा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

बुधवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. दुपारनंतर अनेक ठिकाणी ढग दाटून आल्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. काहींनी कांद्याच्या ढिगांवर प्लास्टिक कागद टाकले, तर काहींनी उपलब्ध साधनसामग््राीच्या मदतीने कांदा झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला.

या भागातील गहू पीकही सध्या काढणीच्या उंबरठ्यावर आहे. गव्हाच्या पिकासाठीही हे हवामान धोकादायक मानले जात आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या पिकांवर अवकाळी पावसाचा फटका बसल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे बाजारभावातील अनिश्चितता आणि दुसरीकडे बदलते हवामान यामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.

परिसरात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा काढण्याची लगबग सुरू केले आहे. या परिसरात कांदा काढण्यासाठी वाशिम, हिंगोली, यवतमाळ, परभणी या जिल्ह्यातून शेतमजूर मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांकडून उघड पद्धतीने कांदा काढण्यासाठी घेत आहेत. 13 हजार रुपये एक एकर क्षेत्रासाठी ते घेत आहेत. त्यातून सध्या कांद्यांना समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसत आहे.
राजेश टेमगिरे, कांदा उत्पादक शेतकरी, नागापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT