पुणे

पुणे : उलगडले पिता-पुत्रांतील स्वरसहवासाचे अनोखे नाते

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुढची पिढी जेव्हा असा वारसा समर्थपणे सांभाळते, पुढे नेते, तेव्हा कलाक्षेत्रही कसे समृद्ध होत जाते, याची प्रचिती रसिकांनी ज्येष्ठ संगीतकार, गायक आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके यांच्या सादरीकरणातून अनुभवली. आपल्या आई-वडिलांचा संगीताचा वारसा श्रीधरजींनी कसा जपला, जोपासला आणि वाढवला, याचे प्रत्यंतर आणि त्यांच्यातील स्वरसहवासाचे अनोखे रेशीमनाते रसिकांसमोर आले. निमित्त होते, सहकारनगर परिसरातील सहजीवन गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी उपक्रमांचे. श्रीधर फडके यांनी सलग दोन दिवस गीतरामायण आणि 'बाबूजी आणि मी' असे कार्यक्रम सादर केले.

फडके यांनी गीतरामायण निर्मितीचा सुमारे 69 वर्षांचा प्रवास आठवणींतून उलगडला. कॅमेरा फिरवावा, तशा दृश्यचौकटी गदिमांनी प्रत्येक गीतात गुंफल्या आहेत आणि बाबूजींनी (सुधीर फडके) त्यानुरूप वातावरणनिर्मिती करणारे, अभिजात स्वर देत गीतरामायण अजरामर केले,' असा उल्लेख करत त्यांनी 'स्वये श्रीरामप्रभू ऐकती', 'दशरथा घे हे पायसदान', 'राम जन्मला गं सखे', 'सावळा गं रामचंद्र' अशी गीते सादर केली.

दुसर्‍या दिवशी 'बाबूजी आणि मी' या शीर्षकांतर्गत श्रीधर फडके यांनी सुधीर फडके यांची निवडक गीते आणि स्वत: संगीतबद्ध केलेली लोकप्रिय गीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. श्रुतिमधुर रचनांचे सादरीकरण करताना श्रीधरजींचे त्यावरील भाष्य, त्या गाण्यांना बिलगलेल्या आठवणी यांची मेजवानीही रसिकांना मिळाली. पं. सत्यशील देशपांडे, पं. अतुलकुमार उपाध्ये, रवींद्र आपटे, शरदचंद्र पाटणकर, अश्विनी कदम, प्रदीप गारटकर, सचिन तावरे उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT