पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहिल्यानगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरच सुरू होणार असून, विद्यापीठाने त्यासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, परीक्षा शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा वाढीव भार पडला आहे. विद्यापीठातर्फे यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत 2018 ते 20 मध्ये 15 टक्के शुल्क वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु, कोरोना काळात शुल्कवाढ करणे संयुक्तिक नसल्याने विद्यापीठाकडून शुल्क वाढ केली गेली नाही. सुमारे सात वर्षांपासून विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केली नव्हती. (Latest Pune News)
परंतु, 2023- 24 व 2024 - 25 या शैक्षणिक वर्षात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीत व परीक्षा घेण्याच्या विषयांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.
मागील काही वर्षांचा विचार करता विद्यापीठाकडून 55 टक्के शुल्क वाढ करणे क्रमप्राप्त होते. परंतु, विद्यापीठाने 20 टक्के शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा केला आहे. वाढीव परीक्षा शुल्काचा तपशील परिपत्रकामध्ये प्रसिद्ध केला आहे. विद्यापीठाने परीक्षा शुल्क जमा करण्याच्या पद्धतीमध्येसुद्धा बदल केला.
दरवर्षी, परीक्षा शुल्कामध्ये वाढ करून विद्यापीठ कुणाचे घर भरत आहे. शेतकरी मरत आहे. वीस टक्के वाढच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाढ केली गेली आहे. आमचे विद्यापीठाला सांगणं आहे ही शुल्कवाढ तत्काळ रद्द करा. अन्यथा, येणाऱ्या काळामध्ये व्यापक प्रमाणामध्ये विद्यार्थी आंदोलन करतील.- राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती