पुणे

Dharmendra Pradhan : देशाला दिशा देण्यात पुण्याचा महत्त्वाचा वाटा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे मत

अमृता चौगुले

पुणेपुढारी वृत्तसेवा : पुण्यात 25 हून अधिक दर्जेदार विद्यापीठे आणि समकक्ष संस्था आहेत. तसेच विचारवंतांची कमतरता नाही, त्यामुळे देशाची संस्कृती समजून घेणे, जतन करणे, अन्वयार्थ लावण्यात पुण्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे पुण्याने देशाला दिशा दिली आहे. देशातील उद्योग आणि धोरण निर्मितीमध्ये पुण्याचे योगदान महत्त्वाचे आहे,' असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या पाच माजी विद्यार्थ्यांचा सन्मान प्रधान यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी प्रधान बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अमृत महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे, ज्येष्ठ उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.

प्रधान म्हणाले, की देशातील सार्वजनिक विद्यापीठांपैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रभावित केले आहे. गेल्या तीस वर्षांपासून पुण्यात येत आहे. पुण्यात पंचवीसपेक्षा जास्त विद्यापीठे आहेत. उद्योग आणि धोरण निर्मितीमध्ये पुण्याचे योगदान महत्त्वाचे आहे. उज्ज्वला योजनेची संकल्पना पुण्यातील अभ्यासातून आली होती. जी-20 परिषदेतून पुढे आलेल्या ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सचा डॉ. प्रमोद चौधरी यांच्यामुळे पुण्याशी संबंध आहे. तसेच शिक्षणाचे जागतिक स्तरासाठीचे प्रारूप विकसित निर्माण करण्याची बुद्धिमत्ता आणि क्षमता पुण्यात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 'माझी माती माझा देश' या उपक्रमात महाराष्ट्राने सक्रिय सहभाग घेऊन चांगली कामगिरी बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठात शास्त्रीय नृत्यासाठीचे केंद्र

डीपीसीतून 10 कोटींचा निधी विद्यापीठाला देऊन शास्त्रीय नृत्यासाठीचे सभागृह आणि केंद्र उभारण्यात येणार आहे. यातून नृत्याला चालना मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT