पुणे

दुर्दैवी! भरधाव ट्रकने दोघा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना चिरडले

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत इंजिनिअरिंगच्या दोघा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. आदिल मजहर शेख (वय 20, रा. अहमदपूर, लातूर), फहाद गोहर गुलाम असकर शेख (20, रा. औसा, लातूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. अफान शौकत शेख (20, रा. उदगीर, लातूर) हा जखमी झाला आहे. अफान याने दिलेल्या फिर्यादीनुसार, विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकचालक शामबाबू रामफल गौतम (35, रा. हडपसर) याला अटक केली आहे. ही घटना नगर रस्त्यावरील वाघेश्वर पार्किंगसमोर सोमवारी (दि. 27) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. दुचाकीवरील दोघे ट्रकखाली सापडल्यानंतरही चालकाने ट्रक तसाच पुढे घेत त्यांना फरफटत नेले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहाद आणि आदिल लातूर जिल्ह्यातील आहेत. ते वाघोलीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत होते. भाडेतत्त्वावर खोली घेऊन ते राहत होते. सोमवारी (दि. 27) रात्री सव्वादहाच्या सुमारास जेवण करून फहाद, अफान हे आदिलला पुणे स्टेशन परिसरात सोडण्यासाठी निघाले होते. पुणे-नगर रस्त्यावरील खराडी परिसरात फहाद, सहप्रवासी आदिल, अफान सिग्नलला थांबले होते. त्यावेळी नगरकडून पुण्याकडे निघालेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. ट्रकने धडक दिल्यानंतर फहाद आणि आदिल चाकाखाली सापडले.

सहप्रवासी अफान फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. चाकाखाली सापडलेल्या फहाद आणि आदिलला ट्रकने फरफटत नेले. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तीनशे मीटर त्याचा पाठलाग करून पकडले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. ट्रकचालक गौतम याला ताब्यात घेण्यात आले असून, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT