नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मामाच्या गावाला यात्रेला आलेला रुद्र महेंद्र फापाळे (वय 8 ) हा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास काळवाडी(ता.जुन्नर) येथे ही घटना घडली .घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले असून वारंवार होणाऱ्या बिबट्यांचे हल्ले यामुळे जनता त्रस्त झाली आहे, आता तरी शासनकडून काही निर्णय होईल का? अजून शासनाला किती लोकांचा बळी पाहिजे? असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान घटनास्थळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर पोचले आहेत. त्यांनीही वन विभागाने तात्काळ बिबट्यांबाबत शासनाने गांभीर्याने निर्णय घ्यावा अन्यथा लोक आता हातात कायदा घेतील असा इशारा दिला आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी जाण्यासाठी निघाले आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभाग देखील हतबल झाल्याचे पाहिला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी पिंपळवंडी येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याने या महिलेवर नारायणगाव येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा