Undri Illegal RMC Plants Pudhari
पुणे

Undri Illegal RMC Plants: ‘रेडीमिक्स प्लांट्स’मुळे जीवन जगणे झाले अवघड; उंड्रीतील संतप्त नागरिकांची भावना

पालिका आयुक्तांकडे कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कोंढवा: उंड्री परिसरातील निवासी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट्समुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, अवजड वाहनांमुळे रस्त्यांची देखील दुरवस्था झाली आहे.

त्यामुळे या प्लांट्सवर तातडीने कारवाई करून ते बंद करण्यात यावेत, अशी मागणी उंड्रीतील संतप्त रहिवाशांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नागरिकांच्या शिष्टमंडळाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नुकतीच आयुक्तांची नुकतीच भेट घेतली.

गेल्या दीड वर्षांपासून विविध शासकीय यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने निवासी भागात सुरू असलेल्या या प्लांट्समुळे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे या वेळी रहिवाशांनी सांगितले. आयुक्तांनी संबंधित प्लांट्सबाबत माहिती नसल्याचे सांगितल्याचा दावा रहिवाशांनी केला.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या प्लांट्समधून होणाऱ्या धूळप्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार वाढत आहेत. तसेच दिवस-रात्र सुरू असलेल्या सिमेंट मिक्सर आणि डंपरच्या वाहतुकीमुळे रस्ते उद्ध्वस्त झाले असून, खड्डे, रस्त्यावर पडलेली खडी आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाल्याचा दावाही त्यांनी केला.

'आम्ही प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याने आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी या वेळी नागरिकांनी केली.

टाटा इनोरा पार्क, गोदरेज प्राणा, गोदरेज ग्रीन्स आणि मयूरी सोसायटीसह परिसरातील रहिवाशांनी या बेकायदेशीर रेडीमिक्स प्लांट्सवर तातडीने कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.

मोठी दुर्घटना किंवा गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्यापूर्वी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय नियमांची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या वेळी रहिवाशांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षात अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या शिष्टमंडळात अर्चना दुबे, रादिया गोहिल, संघमित्रा कर्मकार, राज सिंग आदींसह परिसरातील रहिवाशांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT