पुणे: शहरातील चौकाचौकांत मोठ्या प्रमाणात असेलेले विनापरवाना जाहिरात फलक आणि फ्लेक्सविरोधात महानगरपालिकेने कारवाई तीव्र केली आहे. आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने शहरात पाहणी केली असून, यात 88 अनधिकृत जाहिरात फलक आढळले आहेत. यातील 24 जाहिरात फलक महानगरपालिकेने पाडल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही रस्त्यांवर किंवा भागांत जाहिरात फलक, फ्लेक्स उभारण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घ्यावी लागते. महापालिकेचे शुल्क भरून जाहिरात फलक उभारण्यासाठी मान्यता दिली जाते. (Latest Pune News)
यामधून महापालिकेला उत्पन्न मिळते. मात्र, शहरातील अनेक चौकांमध्ये, तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे जाहिरात फलक उभारले जातात. यामुळे महापालिकेचे उत्पन्नही बुडते.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांचा नुकताच आढावा घेतला होता. तसेच, शहरातील विनापरवाना असलेल्या जाहिरात फलकावर कारवाई करण्याचे आदेशदेखील दिले होते. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाने महापालिका हद्दीत असेलल्या अनधिकृत होर्डिंगची पाहणी केली. या पाहणीत शहरात 88 ठिकाणी विनापरवाना जाहिरात फलक आढळले.
15 क्षेत्रीय कार्यालयात घेतलेल्या शोध मोहिमेमध्ये नगररोड, वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय - 35, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय-37, वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय-11 व येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय 05 असे एकूण 88 अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले आहेत..
24 फलक काढले
या कारवाईत नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 15, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 1, वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 3, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 5 असे एकूण 24 फलक पाडण्यात आले आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
कारवाई पुढे सुरूच राहील
गेल्या दोन ते तीन वर्षांत अवकाळी पाऊस तसेच पूर्वमोसमी पावसामुळे शहरात होर्डिंग्ज पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज विरोधातील कारवाई तीव्र केली आहे. अनधिकृत होर्डिंग्जचा सातत्याने शोध घेतला जात असून, अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील कारवाई पुढे सुरूच राहील, असे विभागाचे उपायुक्त संतोष वारूळे यांनी सांगितले.