पुणे

‘खासगी’चा खर्च परवडेना; सरकारीत पुरेसे बेड नाहीत! रुग्णांसमोर अडचणींचा डोंगर 

Laxman Dhenge
 पुणे : खासगी रुग्णालयांमधील खर्च परवडत नाही आणि शासकीय रुग्णालयांमध्ये पूर्ण मोफत सुविधा मिळत नाहीत, अशा कात्रीत सामान्य नागरिक अडकले आहेत. शहरातील गरीब आणि गरजू नागरिकांना पुरतील इतक्या बेडची महापालिका रुग्णालयांमध्ये सुविधा नसल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दर्जेदार आरोग्य सेवेमध्ये प्रत्येक हजार लोकसंख्येमागे किमान 3 बेड असणे आवश्यक आहे. शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास असताना आवश्यक बेडची संख्या 15 हजार असणे गरजेचे आहे. महापालिकेचे कमला नेहरु रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि प्रसूतीगृहे मिळून 1650 बेडची क्षमता आहे. महापालिका रुग्णालयांमधील खाटा कायम भरलेल्या असल्याने रुग्णांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.
ससून हे जिल्ह्यातील एकमेव सर्वोपचार रुग्णालय आहे. पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, नाशिक, सोलापूर येथूनही अनेक रुग्ण उपचारांसाठी ससून रुग्णालयात येतात. शहरातील रुग्णांना महापालिकेने आरोग्य सेवा पुरवणे गरजेचे असताना कमला नेहरू रुग्णालयातील अनेक रुग्णांची जागेअभावी ससूनला रवानगी केली जाते. त्यामुळे ससूनवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या रुग्णालयांची बेड क्षमता वाढणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
शहराची लोकसंख्या जवळपास 50 लाखांच्या आसपास आहे. आता 34 गावे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमधील यंत्रणा वाढत्या लोकसंख्येला पुरी पडू शकत नाही. शहरात ससून, औंध यांसह एएफएमसी ही शासकीय रुग्णालये आहेत. तरीही, जास्तीत जास्त रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळावेत, यासाठी बेड क्षमता आणि रुग्णालयांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
हेही वाचा
SCROLL FOR NEXT