महिला व्यावसायिक लागल्या तयारीला
पुणे : बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक... त्यामुळेच बाप्पाच्या आगमनाचा दिवस म्हटल्यावर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य ठरलेला आहे. यंदा हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना यंदा मोठी मागणी आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्यात अंदाजे सात लाखाहून अधिक हातवळणीच्या उकडीच्या मोदकांसाठीचे बुकिंग झाले आहे. त्याशिवाय उत्सवाच्या दहाही दिवसांच्या नैवेद्यासाठी, प्रसादासाठी व्यावसायिकांकडे मोदकांसाठी आतापासूनच विचारणा सुरू झाली आहे. अंदाजे साडेतीन हजार व्यावसायिक यावर्षी मोदकांच्या व्यवसायात उतरले असून, हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना गणेश मंडळांसह घरगुती गणपतींसाठीही मोठी मागणी आहे.
गणेशोत्सवात श्रीगणरायाला नैवेद्य दाखविण्यासाठी उत्सवाच्या पहिल्या दिवशी हातवळणीचे उकडीचे मोदक मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. त्यामुळे काही वर्षांत हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करणार्या व्यावसायिकांची संख्या पुण्यात वाढली आहे. महिला व्यावसायिक कौशल्य वापरून हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करीत आहेत. यंदा त्यांच्याकडे चार ते पाच दिवसांपासूनच मोदकांसाठीची ऑर्डर येण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि.27) श्रीगणरायाच्या आगमनानिमित्त मोदकांसाठीचे सारण सध्या तयार केले जात आहे.
महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले की, सुमारे साडेतीन हजारांहून अधिक व्यावसायिक या व्यवसायात उतरले आहेत. मंगळवारी (दि. 26) मध्यरात्रीपासून हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करण्यास व्यावसायिक सुरुवात करतील. त्यासाठीच्या सारणाची तयारी सोमवारपासून (दि. 25) सुरू झाली आहे. आम्हीसुद्धा 10 हजारहून अधिक मोदक तयार करणार आहोत.
आमच्याकडे हातवळणीचे उकडीचे मोदक मिळतील... अशी पोस्ट किंवा पोस्टर सोशल मीडियावर आपण पाहातच असाल... सध्या व्यावसायिकांकडून मोदकांसाठीचे ऑर्डर मिळवण्यासाठी सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी केली जात आहे.
घरपोच मोदक पोचविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. मध्यवर्ती पेठांसह कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, कॅम्प, गोखलेनगर, बाणेर, बावधन, औंध, वानवडी अशा विविध ठिकाणांहून व्यावसायिकांना ऑर्डर मिळाल्या आहेत आणि पहिल्या दिवशी व्यावसायिकांकडून घरपोच मोदक पोचविले जाणार आहेत. यासाठी विविध एजन्सींना पार्सल पोचविण्याचे काम देण्यात आले आहे
हातळवणीचे उकडीचे मोदक तयार करणे हे कौशल्याचे काम आहे. मोदक हा उत्सवातील महत्त्वाचा भाग आहे. तांदळाचे पीठ, नारळ, गुळ आदी विविध प्रकारचे जिन्नस वापरून मोदक तयार केले जातात. एका मोदकाची किंमत 30 ते 45 रुपयांपर्यंत आहे.
मी गेल्या काही वर्षांपासून मोदक विक्रीचा व्यवसाय करीत आहे. उत्सवाच्या चार ते पाच दिवसाआधी ऑर्डर यायला सुरुवात होते आणि त्यानुसार आम्ही तयारी करतो. यंदा उत्सवाच्या पहिल्या दिवसासाठी 2 हजार मोदकांसाठीची ऑर्डर मिळाली आहे.- ज्योती ठाकूरदेसाई, महिला व्यावसायिक