Fishermen Pudhari
पुणे

Ujani Fishermen Protest: उजनीतील मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर ठेक्याचे संकट; ईओआयविरोधात आंदोलनाची ठिणगी

१० वर्षांच्या नियोजनासाठी पाच कंपन्यांचा स्वारस्य दाखवण्याचा दावा; मच्छीमार, व्यापारी, अडतदारांसह हजारो घटक धास्तावले

पुढारी वृत्तसेवा

भिगवण: उजनीतील पारंपरिक व भूमिहीन मच्छीमारांच्या मानगुटीवर पुन्हा ठेक्याचे महासंकट उभे ठाकले आहे. परिणामी, मच्छीमारांसह व्यापारी, अडतदार, जाळी दुकानदार, तोडणारे, हॉटेलचालक, वाहनमालक, चालक, किरकोळ विक्रेते यांना हादरा बसला असून, मोठे जनआंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या वेळी मच्छीमारांचा विकास या नावाखाली १० वर्षांचे नियोजन चाचपणी स्वरूपात कृष्णा खोरे विकास महामंडळाने केले आहे. यासाठी महामंडळाने स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) पद्धतीचा अवलंब केला आहे. यामध्ये सुमारे पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. महामंडळाने ईओआय प्रसिद्ध केल्यापासून उजनीतील पारंपरिक मच्छीमार, व्यापारी, अडतदार, किरकोळ विक्रेते, जाळी व्यावसायिक, तोडणारे, हॉटेलचालक आदीजण भयभीत झाले आहे.

उजनीतील मासेमारी व्यवसायावर पारंपरिक मच्छीमार, धरणग्रस्त, पारधी समाज, मागासवर्गीय समाजाच्या अनेकांचा रोजगार उपलब्ध आहे; मात्र, महामंडळाने काढलेल्या ईओआय पद्धत सर्वानाच देशोधडीला लावण्याची भीती व्यक्त झाली आहे. त्यातून मच्छीमार संघटना आक्रमक झाल्या असून, आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

महामंडळाच्या उपक्रमात मासेमारी अधिक व्यवस्थित, संरक्षित व उत्तरदायिक करणे आणि पकडलेले माशांच्या प्रमाणानुसार महसूल वाढवणे, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी पिंजरा पद्धतीचे मत्स्यपालन करणे, जलस्रोतांच्या जवळ मोकळ्या जमिनीवर आरएएस विकसित करून शोभिवंत मासे, उच्च मूल्य खाद्य,मासे, कोळंबी, शिंपले, गोगलगाय, मस्यालयीन वनस्पती, तेल, लोणचे आदी प्रक्रिया उद्योग, पिंजरा पद्धत, जाळी देखभाल, बर्फ कारखाने, कोल्ड स्टोअरेज, प्रयोगशाळा आदी सुविधांचा यामध्ये समावेश आहे. असे असले तरी ही चाचपणी प्रक्रिया स्थानिक मच्छीमारांचा व त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांच्याच उदरनिर्वाहाच्या मुळावर बसणार प्रकल्प असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार व व्यापारी वर्गाने केला आहे.

याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मच्छीमारांनी भेट घेऊन निवेदने सादर केली असता आपण मच्छीमारांसोबत असल्याची प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे. येथील उजनी मच्छीमार बचाव अभियानाच्या वतीने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनीही भेट घेऊन पाठिंबा मिळवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आंदोलनाला धार येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अनेकांचा डोळा

कृष्णा खोरे विकास महामंडळाने चाचपणी स्वरूपात मागावलेल्या स्वारस्य अभिव्यक्ती अर्थात ईओआयमध्ये काही कंपन्या व राजकीय व्यक्तींनी स्वारस्य दाखवले आहे. उजनीच्या मासेमारीतून होणारी एकूण आर्थिक उलाढाल राजकीय नेत्यांच्या व त्यांच्या आडून कंपनीचा यावर डोळा आहे. त्यातनूच ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप मच्छईमार व व्यापारी प्रतिनिधींनी केला आहे; मात्र, ही प्रक्रिया हाणून पाडल्या शिवाय स्वस्थ न बसण्याचा निर्धार मच्छईमार, व्यापारी, अडतदार, तोडाई, जाळी, हॉटेल व्यावसायिक आदींनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT