Seagulls Pudhari
पुणे

Migratory Seagulls: उजनी जलाशयावर स्थलांतरित सी गल पक्ष्यांचे आगमन

दीड महिना उशिरा हिवाळी पाहुण्यांची हजेरी; पक्षी निरीक्षकांमध्ये आनंद

पुढारी डिजिटल टीम

प्रवीण नगरे

पळसदेव: गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि उजनी धरण अद्याप तुडुंब भरलेले असल्याने यंदा उशिरा येणारे स्थलांतरित मत्स्याहारी समुद्रपक्षी अखेर उजनी जलाशयावर दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सी गल्स (गल पक्षी) यांचा समावेश असून, ही माहिती ज्येष्ठ पक्षी अभ्यासक प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांनी उजनी परिक्रमानंतर दिली.

इंदापूर तालुक्यातील पळसदेवसह डिकसळ येथील रेल्वे पूल परिसर, कोंडार-चिंचोली, टाकळी, कात्रज, पोमलवाडी, केत्तूर, काळेवाडी आदी उजनी काठावरील गावांच्या विस्तृत पाणफुगवट्यावर हे पक्षी मासेमारी करताना व पाण्यावर विहारताना मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. दक्षिण रशिया, पूर्व मंगोलिया, पॉलिआर्क्टिक प्रदेश तसेच हिमालयातील मानसरोवर व लडाखमधील सरोवरांमध्ये विणीला जाणारे आणि सागरी किनाऱ्यावर मासेमारी करणारे विविध प्रजातींचे गल पक्षी दरवर्षी हिवाळ्यात उजनी जलाशयावर येतात. यंदा त्यापैकी ब्लॅक हेडेड गल हे पक्षी मागील आठवड्यात दाखल झाले आहेत.

गल पक्ष्याची वैशिष्ट्‌‍ये

गल हे हिवाळी पाहुणे पक्षी असून त्यांना समुद्रपक्षी, केगो किंवा कीर या नावांनीही ओळखले जाते. आकाराने बाह्मणी घारीएवढे असलेले ब्लॅक हेडेड गल पक्षी उजनी जलाशयावर येताना पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे दिसतात. मात्र काही दिवसांत त्यांच्या डोक्यावर काळा ठिपका तयार होतो. परतीच्या प्रवासाच्या वेळी, म्हणजे उन्हाळ्यापूर्वी, हा रंग तपकिरी होतो. या पक्ष्यांच्या पंखांचा अग््राभाग शुभ पांढरा असून कडा गडद काळसर असतात. चोच पिवळ्या रंगाची असून टोक काळ्या रंगाचे असते. हे पक्षी दिवसभर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहून खोलवर बुड्या मारत माशांची शिकार करतात.

पक्षी निरीक्षकांमध्ये विशेष उत्साह

उजनी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले असून माशांच्या निकोप वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे गल पक्ष्यांबरोबरच विविध प्रजातींची बदकेही लवकरच उजनीवर दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खाऱ्या पाण्यातील माशांवर उपजीविका करणारे हे मत्स्याहारी पक्षी उजनीतील गोड्या पाण्यातील माशांवर सक्रियपणे शिकार करताना दिसत असल्याने पक्षी निरीक्षकांमध्ये विशेष उत्साह संचारला आहे.

स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या उजनी धरणाच्या विस्तीर्ण जलाशयावर हिवाळ्याच्या प्रारंभी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू होते. यंदा नेहमीपेक्षा सुमारे दीड महिना उशिरा समुद्रपक्षी दाखल झाले आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ विविध प्रकारची बदके व अन्य पक्षी येण्याची शक्यता आहे. मत्स्याहारी पक्ष्यांचे आगमन हे उर्वरित स्थलांतरित पक्ष्यांसाठी शुभसंकेत मानले जात आहेत.
प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT