Two Pune policemen suspended
पुणेः येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दयानंद शिवाजी कदम आणि अश्विन ईश्वर देठे या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. मैत्रीणीसोबत बोलत थांबलेल्या तरुणाला ब्लॅकमेल करून गुन्हा दाखल करण्याच्या धमकीने 50 हजार रुपये मागितल्याचा दोघांवर आरोप आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. (Pune News Update)
दरम्यान, दैनिक पुढारीने ऑफ द रेकॉर्ड या सदरामध्ये पोलिस नव्हे; हे तर खंडणीखोर? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून हा प्रकार उजेडात आणला होता. दोघा पोलिसांच्या कारनाम्याची गंभीर दखल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली. दोघा पोलिसांचे वर्तन अशोभनिय, बेशिस्त आणि बेजबाबदारपनाचे असून, त्यांच्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांचे तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतची चौकशी लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्याकडे दिली आहे.
पोलिस कर्मचारी कदम आणि देठे हे दोघे 24 एप्रिल रोजी येरवडा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कॉमर्स झोन परिसरात तरुण-तरुणी गाडीत बोलत थांबले होते. त्यावेळी दोघे पोलिस तेथे आले. त्यांनी तरुणाला तुम्ही गाडीत बसून अश्लिल चाळे करत आहात. तुमच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करतो अशी भिती दाखवून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. तरुणाने याबाबत थेट येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार तरुण हा टिंगरेनगर येथे राहणारा असून, तो कॉलेजमध्ये शिकतो. गुरुवारी (दि. 24) वैद्यकीय उपचारासाठी तो कॉमर्स झोन येरवडा येथील एका डॉक्टरकडे आला होता. काम झाल्यानंतर तो बाहेर पडला. तरुणाला त्याची मैत्रीण भेटली. त्यावेळी सायंकाळचे पाच वाजले होते. तरुण आणि त्याची मैत्रीण दोघे चारचाकी गाडीत बसून गप्पा मारत होते. या वेळी एक पोलिस दुचाकीवरून आला. त्याने दोघांची कोणत्याही प्रकारची खात्री न करता, तुम्ही दोघे या ठिकाणी अश्लील चाळे करत आहात. मला पन्नास हजार रुपये द्या, नाहीतर तुमच्यावर कारवाई करतो, असे धमकावले. साहेब, आम्ही गाडीत बोलत बसलोय, असे तरुणाने सांगितले. पैसे मागणार्या पोलिसाने फोन करून दुसर्या एका पोलिसाला बोलावून घेतले. त्याने देखील तरुणाला धमकावत तुला आम्हाला पैसे द्यावेच लागतील, नाहीतर तुमच्या दोघांवर कारवाई होईल, असे म्हटले. दोघांना तरुणाने त्यांची नावे विचारली. परंतु, त्यांनी आपली नावे सांगितली नाहीत. हा प्रकार पाहून तरुणाची मैत्रीण घाबरली होती. सुरुवातीला पन्नास हजार रुपयांची मागणी केलेल्या पोलिसाने तरुणाकडे पुन्हा वीस हजार रुपये मागितले.
तरुणाने पैसे देण्यास नकार देत, त्याच्या मामाला हा प्रकार फोनद्वारे सांगितला. तरुणाला गाडी जप्त करण्याची धमकी देत पोलिसांनी पैसे मागितले. तरुणाला दोघांनी जेल रोड पोलिस चौकीच्या बाहेर थांबवून ठेवले. त्याची गाडी चौकीला घेऊन आले. तरुणाच्या मामाने येरवडा पोलिस ठाण्यात त्याला बोलावून घेतले. तोपर्यंत हा प्रकार येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्यापर्यंत पोहचला होता. त्यांनी तरुणाची तक्रार दाखल करून घेतली. शेळके यांनी याबाबतचा अहवाल पोलिस वरिष्ठ अधिकार्यांना पाठवून दिला होता. त्यानंतर आता या दोघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
दोघा पोलिस कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबातची चौकशी लोणीकंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आली आहे.हिम्मत जाधव, पोलिस उपायुक्त परिमंडळ चार