पुणे

खडकी टर्मिनलवर दोन प्लॅटफॉर्म वाढणार; 35 कोटींचा निधी मंजूर

Sanket Limkar

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या खडकी टर्मिनलवर लवकरच दोन प्लॅटफॉर्म वाढवले जाणार आहेत. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांचा आणि प्रवाशांचा ताण काहीसा कमी होणार आहे. प्लॅटफॉर्म वाढल्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दिवसाला सुमारे 200 ते 230 रेल्वे गाड्यांची येथून ये-जा असते. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर मोठा ताण येत आहे. येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून, यामुळे अनेक समस्यांना रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन आता रेल्वे स्थानकांवरील प्लॅट फॉर्म वाढवण्याचे नियोजन करत असून, मुंबईप्रमाणेच पुणे शहर परिसरातील स्थानके टर्मिनल म्हणून विकसित करण्यावर भर देत आहे. यानुसार रेल्वेकडून पुणे रेल्वे स्थानक परिसरातील हडपसर आणि खडकी स्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करण्याचे काम सुरू आहे. ही स्थानके आगामी काळात पूर्णपणे विकसित झाल्यास पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार आहे. त्या दृष्टीने रेल्वेच्या पुणे विभागाकडून कामे केली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून खडकी टर्मिनलवर दोन प्लॅटफॉर्म वाढवले जाणार आहेत. त्यामुळे येथील प्लॅटफॉर्मची संख्या आगामी काही दिवसांत तीन अशी असणार आहे, त्याकरिता रेल्वे प्रशासनाला (पुणे विभाग) 35 कोटींचा निधी मंजूर झाला असून, रेल्वे बोर्डानेही या कामाला मान्यता दिली आहे. त्यानुसार येथील एका प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार, तर एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे.

प्लॅटफॉर्म लांबीचा याकरिता होणार फायदा

पुुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाजवळील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याचे नियोजन रेल्वेच्या पुणे विभागाकडून करण्यात येत आहे. या संदर्भातील प्रस्ताव पुणे विभागाने रेल्वे मुख्यालयाला दिला आहे. त्यामुळे पुण्यातून धावणार्‍या एक्स्प्रेस गाड्यांना पुणे स्टेशनजवळच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर लवकरच थांबे दिले जाणार आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची संबंधित भागात उतरण्यासाठी सोय होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. या निर्णयाला मान्यता आल्यास त्याची तत्काळ अंमलबाजवणी केली जाणार आहे. याकरिता वाढविण्यात येणारे 2 प्लॅटफॉर्म रेल्वेसाठी फायद्याचे ठरणार आहेत.

स्व. खासदार गिरीश बापट यांनीही केले होते प्रयत्न

प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन पुणे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी खडकी रेल्वे स्टेशनवर टर्मिनल विकसित करावे, अशी मागणी तत्कालीन स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी केली होती. या विषयाकडे तत्कालीन रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी बापट यांनी कामकाज नियमावलीतील नियम 377 अन्वये लोकसभेच्या अध्यक्षांना निवेदनदेखील दिले होते.

पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी खडकी टर्मिनलवर 2 प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाली आहे. तसेच, 35 कोटींचा निधीदेखील मंजूर झालेला आहे. कामाचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार असून, निविदा प्रक्रियेच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर येथे एकूण तीन प्लॅटफॉर्म असणार आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT