पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातांत भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. पुणे- सोलापूर रस्ता, तसेच येरवडा भागात अपघाताच्या घटना घडल्या. याप्रकरणी वाहनचालकांविरुद्ध हडपसर आणि येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
नगर रस्त्यावरील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अमोघी भीमप्पा बिसनाळे (वय 72, रा. वडारवस्ती, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा परशुराम (वय 39) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोघी बिसनाळे हे मंगळवारी (दि. 20) सकाळी नऊच्या सुमारास येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून निघाले होते. नगर रस्त्यावरील श्री हॉस्पिटलसमोरून ते रस्ता ओलांडत होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळावरून वाहनचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बिसनाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील तपास करत आहेत. पुणे- सोलापूर रस्त्यावर रविदर्शन चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विमलाबाई मथुराप्रसाद अगरवाल (वय 82, रा. लोणावळा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी टेम्पोचालक विनोद भगवान गायकवाड (वय 45, रा. लोणी काळभोर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मनोज अगरवाल (वय 38, रा. लोणावळा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल मूळचे लोणावळ्यातील आहेत. ते कामानिमित्त हडपसर भागात नातेवाईकांकडे आले होते. सोलापूर रस्त्यावरील रविदर्शन चौकात गुरुवारी (दि.22) विमलाबाई रस्ता ओलांडत होत्या. त्या वेळी भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणार्या विमलाबाई यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या विमलाबाई यांचा मृत्यू झाला. टेम्पोचालकाला पकडून नागरिकांनी पोलिसांच्याताब्यात दिले. सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत.