पोंदेवाडी येथे दोन मोरांचा अचानक मृत्यू File Photo
पुणे

Peacock Death: पोंदेवाडी येथे दोन मोरांचा अचानक मृत्यू

मृत्यूचे कारण शोधून वन विभागाने उपाययोजना करण्याची पशू-पक्षिप्रेमींची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Pondewadi peacock death

मंचर: पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (दि. 18) दोन मोरांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मोरांच्या मृत्यूचे कारण वन विभागाने शोधून त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी पर्यावरण आणि पशू-पक्षिप्रेमींनी केली आहे.

पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक, जारकरवाडी, धामणी या परिसरामध्ये 100 पेक्षा अधिक मोरांचे वास्तव्य आहे. जंगली भाग आणि डोंगर परिसर असल्यामुळे मोरांना बागडण्यासाठी नैसर्गकि वातावरण येथे आहे. (Latest Pune News)

त्यामुळे या परिसरात मोरांची संख्या जास्त असल्याची माहिती पोंदेवाडीचे माजी सरपंच, तसेच आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज आणि माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी दिली. सध्या या ठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतात मोर मोठ्या प्रमाणात येत असल्याने या परिसरात मोर पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

दरम्यान, पोंदेवाडी येथील पोखरकरवस्ती येथे दोन मोर मृतावस्थेत आढळून आले. ही घटना मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले आणि वनरक्षक पूजा कांबळे यांना माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी कळवली. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून मृत मोरांचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये मोरांचा मृत्यू कशामुळे झाला याची कारणमीमांसा केली जाईल, असे मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसलेयांनी सांगितले.

मोरांच्या मृत्यूची प्रमुख कारणे

कीटकनाशके आणि बुरशीनाशके : शेतीक्षेत्रात वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांमुळे आणि बुरशीनाशकांमुळे मोरांचा मृत्यू होत आहे. कर्नाटकातील एका घटनेत बुरशीनाशकामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शेतात फवारलेले रासायनिक पदार्थ मोरांनी ग्रहण केलेल्या धान्य किंवा पाण्यामार्फत त्यांच्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे विषबाधा होते.

दूषित अन्न आणि पाणी : दूषित पाणी किंवा खराब झालेले अन्न मोरांना विषबाधा करू शकते, ज्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू होतो. ही माहिती घोडेगावचे पर्यावरणमित्र धनंजय कोकणे यांनी दिली.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून त्याच्या रंगीत पिसार्‍यामुळे आणि डौलदार सौंदर्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो. परंतु, अलीकडील काळात मोरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मोरांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन वन विभागाने त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- रमेशशेठ येवले, उद्योजक, गंगापूर (ता. आंबेगाव)
मोरांना विषबाधा झाली असून, या विषबाधेमुळे यकृतावर परिणाम झाला आहे. परिणामी मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तसेच काविळीची लक्षणे दिसून येतात.
- डॉ. नागेश पुरी, पशुवैद्यकीय अधिकारी, काठापूर
मृत मोर पोंदेवाडी नर्सरीत आणले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. त्यामध्ये विषबाधा झाली असल्याचे निदर्शनास आले. या मोरांचे सर्व अवयव शाबूत आहेत. त्यामुळे शिकारीचा उद्देश नसल्याचे दिसून येते. या परिसरातील मोरांवर वन विभागाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.
- विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT