शिवम आंदेकरला आणखी एक दणका; समर्थ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल Pudhari
पुणे

Shivam Andekar News: शिवम आंदेकरला आणखी एक दणका; समर्थ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचे मृत्यू प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘नाना पेठेत विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणात आंदेकर टोळीतील सराइत शिवम आंदेकरसह साथीदारांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फलकासाठी घेतलेला बेकायदा वीजजोड, तसेच शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणात आंदेकरविरुद्ध समर्थ पोलिसांनी मोठी कारवाई केली.

मासे विक्रेत्याला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी शिवम आंदेकरसह साथीदारांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘नाना पेठेतील डोके तालीम चौकात गेल्या आठवड्यात फलकाच्या खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सायली डंबे (वय 8) हिचा मृत्यू झाला होता. (Latest Pune News)

या घटनेत एक मुलगा जखमी झाला होता. सुरुवातीला या प्रकरणात समर्थ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. डोके तालीम चौकात लोखंडी फलक लावण्यात आला आहे. या फलकात दिवे लावले होते.

हा फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. जवळच असलेल्या महावितरणच्या खांबातून बेकायदा वीजजोड घेऊन तेथे दिवे लावण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला, अशी माहिती समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.

वीज चोरी प्रकरणात स्वतंत्र गुन्हा

‘महावितरणच्या खांबावरून बेकायदा वीजजोड घेतल्याप्रकरणी शिवम आंदेकर याच्यासह साथीदारांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार भारतीय विद्युत कायदा कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT