बारामती : पुढारी वृत्तसेवा : पहिल्यांदा शरद पवार यांनी पाडवा समारंभ सुरू केला, ती पुढे परंपरा बनली. त्यानंतर त्यांचे बोट धरून अजित पवार आले. ते इथे उभे राहू लागले. आता दादांनी वेगळा निर्णय घेतला असेल, त्याविषयी आपल्याला जास्त बोलता येणार नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, इथेही लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी आज (दि.२) साजरा झालेल्या पवार कुटुंबाच्या दोन पाडवा समारंभावर दिली.
अजित पवार यांच्या नंतर सुप्रिया सुळे इथे आल्या त्या उभ्या राहिल्या. त्या शुभेच्छा स्वीकारत राहिल्या. त्यानंतर मी इथे आलो. मी शुभेच्छा स्वीकारत राहिलो. खरं तर ही एक परंपरा बनली होती. महाराष्ट्रातील लोक शरद पवार यांना भेटण्यासाठी ५०-५५ वर्षांपासून येत आहेत. अजित पवार त्यानंतर सामील झाले. आता शरद पवार जिथे उभे राहतात, त्याच ठिकाणी लोक त्यांना भेटायला जातात. असेही पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सगळ्यात खास महत्वाची गोष्ट अशी आहे की, पवारांना भेटण्यासाठी नेते कमी आणि सामान्य लोक सर्वात जास्त आहेत. तिकडे नगरसेवक मोठे मोठे नेते, व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर असतील, मात्र लोकशाही मध्ये सामान्य लोकांची ताकद ही पैशापेक्षा खूप मोठी आहे. हे महत्त्वाचे
१७० ते १८० आमदार महाविकास आघाडीचे राज्यात निवडून येतील. तुम्ही पहाल. एक सुप्त लाट आहे. लोक योग्य निर्णय घेणार आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेत्यांनी कारभार केला आहे, तो लोकांना माहित आहे. शेतकरी अडचणीत आहे. कालच सोयाबीनचे दर २२०० रुपयांवर घसरले आहेत, मात्र तेलाचे दर मात्र खूप महागले आहेत. दिवाळीचे घर पूर्वी जसे रंगवले जायचे, रंगरंगोटी केली जायची आज तशी दिसत नाही, कारण लोकांच्या हातात पैसा नाही. असेही रोहित पवार म्हणाले.