पुणे

एकाच मंडल अधिकार्‍याविरोधात दोन तक्रारी; काय आहे प्रकरण?

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेतजमिनीच्या सात-बारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या दोन तक्रारी थेऊरमधील मंडल अधिकार्‍याविरोधात आल्याचे समोर आले आहे. एका तक्रारीनुसार 10 हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकार्‍यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे दुसर्‍या तक्रारीमध्ये सापळा कारवाई होऊ शकली नाही. मात्र, लाचेची मागणी केली गेली असल्याने कार्यालयात काम करणार्‍या खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही तक्रारी कोलवडी गावातील होत्या.

मंडल अधिकारी जयश्री कवडे (रा. थेऊर, ता. हवेली), खासगी संगणक ऑपरेटर योगेश कांताराम तातळे (वय 22, रा. दिघी) आणि एजंट विजय सुदाम नाईकनवरे (वय 38, रा. नागपूर चाळ, येरवडा) अशी यापूर्वी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. शेतजमिनीचे सात-बारा उताऱ्यातील आजीच्या वडिलांचे नाव कमी झाल्याचे फिर्यादी यांना दिसून आले होते. ते नाव पुन्हा लावण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. तहसीलदारांनी नाव पुन्हा लावण्याचे आदेश दिले होते. तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदीप्रमाणे नोंदी घेण्यासाठी फिर्यादी मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना भेटले.

त्यांनी खासगी व्यक्ती विजय नाईकनवरे याला भेटण्यास सांगितले. त्यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 12 मार्च रोजी सापळा रचून थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात लाच घेताना पकडले. तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या प्रकरणात तक्रारदार यांनी कोलवडीमधील जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सात-बारा उतार्‍याची नोंद, फेरफार मंजूर करण्यासाठी थेऊर मंडल अधिकार्‍याकडे अर्ज केला होता. तेथे काम करणारा विजय नाईकनवरे याने तक्रारदारांकडे 80 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली. त्याची पडताळणी 15 फेब्रुवारी व 28 फेब्रुवारी रोजी केली होती. मात्र, या तक्रारीत प्रत्यक्ष सापळा कारवाई पूर्ण होण्यापूर्वीच दुसर्‍या तक्रारीत विजय नाईकनवरे याच्यासह मंडल अधिकार्‍यावर कारवाई केली होती. लाचेची मागणी केली गेली असल्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT