जुन्नर: जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील दुर्गावाडीच्या कोकणकडा येथील सुमारे बाराशे फूट खोल दरीत दोघांचे मृतदेह आढळले. जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली. जुन्नर पोलिस व रेस्क्यू टीमने हे मृतदेह दरीतून बाहेर काढले. रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि आंबोली (ता. जुन्नर) येथील महाविद्यालयीन युवती रूपाली संतोष खुटाण या दोघांचे हे मृतदेह असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे दुर्गावाडीचे परंतु नोकरीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले पारधी हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. (Latest Pune News)
याबाबतची तक्रार त्यांच्या पत्नीने अहिल्यानगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दिली होती. रूपाली ही देखील बेपत्ता होती. तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता. दुर्गावाडी येथील रिव्हर्स वॉटर फॉलच्या कड्यापासून काही अंतरावर एक पांढर्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यावरून या परिसरात शोध घेतला असता एका कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळल्या.
कोणीतरी कड्याच्या परिसरात पडले असावे या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस तसेच ग्रामस्थांनी शोध घेतला असता कड्याखाली मुलीचा मृतदेह दिसला. त्यामुळे जुन्नर पोलिसांसह जुन्नर रेस्क्यू टीम रविवारी (दि.22) कोकणकड्यावर पोहोचली.
परंतु, दाट धुके आणि पाऊस तसेच अंधारामुळे शोधकार्य करता आले नाही. त्यामुळे रिस्क्यू टीमसह पोलिसांनी सोमवारी (दि. 23) सकाळपासून दरीत उतरून पाहिले असता रूपालीचा मृतदेह आढळला. त्यापासून काही अंतरावर पारधी यांचा मृतदेह आढळला.
जुन्नर रेस्क्यू टीमचे रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण तसेच अन्य सदस्य व जुन्नर पोलिस ठाण्याचे फौजदार रघुनाथ शिंदे, पोलिस कर्मचारी गणेश शिंदे, दादा पावडे व अन्य सहकार्यांनी मृतदेह दरीतून बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी जुन्नरच्या श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठविले.