Tukaram Mundhe Autobiography Launch Pudhari
पुणे

Tukaram Mundhe Autobiography Launch: आईच्या आठवणीने तुकाराम मुंढे भावुक; आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात उसळली चाहत्यांची गर्दी

"नैतिकता सोडू नका, स्पर्धा परीक्षेतील यश अंतिम नाही" ; मुंढेंच्या भाषणासाठी तरुणाईची तीन तास प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: "तुकाराम"चे वय अवघे आठ वर्षांचे. तो खूप आजारी झाला. आईने दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी अतिसार झाल्याचे सांगत कडू औषध दिले, पण तुकाराम ते घेईना. शेजारच्या बाईने सांगितले, औषध दिल्यावर चिमूटभर साखर जिभेवर घाला, म्हणजे तो औषध घेईल. त्यावर आई म्हणाली अहो, घरात साखरच नाही. आम्ही फक्त सणवारी साखर आणतो!" हा किस्सा शफी पठाण यांनी सांगताच तुकाराम मुंढे यांचे डोळ पाणावले. डोळे बंद करून आईच्या आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला.

निमित्त होते मुंढे यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याचे. राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तथा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना पाहण्यासाठी टिळक स्मारक मंदिरात आबालवृद्धांची अलोट गर्दी उसळली होती. त्यांचा कौतुक सोहळा आणि भाषण ऐकण्यासाठी तीन तास उभे राहत तरुणाईने गर्दी केली होती. कार्यक्रम ५ वाजता होता.

मात्र, सभागृह खचाखच गर्दीने दुपारी ४ वाजताच भरून गेले. हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी तुकाराम मुंढे यांची पत्नी, मुलगी, मुलगा, दोन मोठे भाऊ, वहिनी हे आवर्जून आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, मुंढे यांचे मोठे भाऊ माजी अपर जिल्हाधिकारी अशोक मुंढे, माजी सनदी अधिकारी संग्राम गायकवाड, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, लेखक शफी पठाण उपस्थित होते.

कोण काय म्हणाले...

  • तुकाराम मुंढे : माझ्या तरुण मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील यश हे अंतिम नाही. स्पर्धा परीक्षा देणारा कधी फेल होत नाही. त्यामुळे नैतिकता सोडू नका. नैतिकतेने जो वागतो तोच आयुष्यात यशस्वी होतो.

  • रंगनाथ पठारे : आज समाजातील सुसंस्कृतपणा अगदी रसातळाला गेला आहे. अमेरिकेपासून ते आपला भारत आणि महाराष्ट्रही त्यातून सुटला नाही. अशा वेळी तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी अत्यंत प्रमाणिकपणे, धाडसाने काम करतो ही अभिमानाची बाब.

  • अशोक मुंढे : (तुकाराम मुंढेे यांचे मोठे बंधू) : मी उपजिल्हाधिकारी झालो तेव्हा माझा भाऊ म्हणून तुकारामची ओळख होती. मात्र, आज माझी ओळख करून देताना लोक म्हणतात, हे तुकाराम मुंढे यांचे भाऊ. मला त्याचे काम पाहून आभिमान वाटतो, तशी काळजी देखील वाटते.

क्षणचित्रे...

  • दोन सभागृहांत आबालवृद्धांनी उभे राहून तीन तास कार्यक्रम पाहिला एका ठिकाणी प्रत्यक्ष, तर दुसऱ्या ठिकाणी पडद्यावर सुरू होते प्रक्षेपण.

  • तरुणाईने मोबाईवर चित्रीकरण करीत मुंढे यांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह चित्रीकरण केले.

  • तुकाराम मुंढे पत्नी, मुलगा, मुलीसह व्यासपीठावर येताच गर्दीने टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून अभिवादन केले.

  • सभागृहात जागाच नसल्याने शेवटी चक्क व्यासपीठावर जाऊन बसली तरुणाई.

  • सर्वांची भाषणे झाल्यावर शेवटी तुकाराम मुंढे म्हणाले, असेच प्रेम माझ्यावर राहू द्या. मी बोलणार नाही. त्यावर प्रचंड जल्लोषात एकच सूर झाला. सर... बोला... बोला. त्यानंतर मुंढे केवळ अडीच मिनिटे बोलले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT