पुणे : लहानपणापासून घरी राजकारण जवळून अनुभवत आले आहे. लग्नानंतर शिरूर तालुक्यातील वरुडे गावची बिनविरोध सरपंच झाले. पती संतोष भरणे यांचे सामाजिक काम मोठे असल्याने गावात मी बिनविरोध निवडून आले. ऐनवेळी भाजपकडून तिकीट मिळाले. या संधीचे सोने करीत निवडून आले. खराडी-वाघोली प्रभागात अनेक समस्या आहेत. पाण्याची गंभीर समस्या आहे. यासोबतच ड्रेनेजलाइन नाही. त्यामुळे येत्या पाच वर्षांत प्रामुख्याने या समस्या सोंडविण्यावर भर देणार आहे, अशी भावना पुणे महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविका तृप्ती भरणे यांनी दै. ‘पुढारी’शी दिलखुलास गप्पा मारताना व्यक्त केली.
तृप्ती भरणे या प्रभाग क्रमांक 4 खराडी-वाघोली ‘क’ गटातून 40 हजार 40 अशा सर्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग््रेासच्या दर्शना पठारे यांचा पराभव केला. त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल ‘पुढारी’च्या संपादकीय विभागाशी गप्पा मारताना भरणे म्हणाल्या, लहानपणापासून राजकारणाची आवड होती. शालेय शिक्षण नूमविमध्ये झाले. त्यानंतर बीकॉम केले. संतोष भरणे यांच्याशी लग्न झाल्यावर सासरी देखील राजकीय वातावरण होते.
मूळगावी सरपंचपदाची निवडणूक झाल्यावर महिला अरक्षणामुळे मी निवडणूक लढली. या निवडणुकीत चांगले यश मिळाले. या अनुभवाचा फायदा महापालिका निवडणुकीत झाला. भाजपकडून ऐनवेळी तिकीट मिळाली. ‘क’ गट महिलासाठी राखीव असल्याने उमेदवारी अर्ज भरला. वाघोली-खराडी परिसरात संतोष भरणे यांचे मोठे सामाजिक कार्य होते. लग्नानंतर त्यांच्यासोबत मी देखील सामाजिक कामे केली. विशेषतः कोरोना काळात आम्ही अनेकांना मदत केली. निवडणूक नसताना देखील आम्ही आमचे काम सुरूच ठेवले होते. याचा फायदा आम्हाला झाला. प्रचाराचे योग्य नियोजन केले. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. यामुळे मी निवडून आले, असे भरणे म्हणाल्या.
वाघोली हे नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेले गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या समस्या आहेत. या ठिकाणी पाण्याची सोय नाही, तर रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन देखील नाहीत. यामुळे प्रामुख्याने या समस्या सोडविणार आहे. तसेच, महिलांना रोजगार मिळावा, त्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.