पुणे

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग होणार सुरक्षित; सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांची माहिती

अमृता चौगुले

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सह्याद्रीच्या रांगांमधील निसर्गसौंदर्याने नटलेल्या व पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेल्या विलोभनीय परिसरातील हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी व पर्यटनासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. या गडावर पाऊलखुणा करण्यात येणार असल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

गडाचा संपूर्ण परिसर हजारो फूट खोल दर्‍या, घनदाट झाडी, डोंगर कडे मिळून बनलेला आहे. पावसाळ्यात या भागात पावसाची कोसळधार असते, तसेच दाट धुके, थंडगार हवा वाहते. ट्रेकर्स व पर्यटक भलतेच धाडस करून रात्रीच्या किर्रर्र काळोखात डोंगर चढणीचा पायी प्रवास करताना गत काळात जंगलातील पायवाट विसरून भरकटल्याची अनेक उदाहरणे आहेत.

अनेकदा ट्रेकर्सला अपघाती मृत्यूलादेखील सामोरे जावे लागले आहे. वारंवार भरकटणारे ट्रेकर्स, घडणारे अपघात व दुर्दैवी मृत्यू या पार्श्वभूमीवर वन विभागासोबत योग्य तो समन्वय साधून गडाकडे जाणार्‍या वाटांवर पाऊलखुणा करण्याचा निर्णय घेतल्याचे सहायक पोलिस निरीक्षक कांडगे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले आहे.

बुधवारी (दि. 2) अनिल ऊर्फ बाळू नाथाराव गिते (वय 35, मूळ रा. जालना, सध्या रा. लोहगाव, पुणे) याचा ट्रेकिंगसाठी गडावर जाताना गारठून मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याच्यासमवेत अनिल आंबेकर, गोविंद आंबेकर, तुकाराम निपाले, महादू भुतेकर, हरिओम बोरुडे आदी ट्रेकर्स पायी प्रवास करीत होते; मात्र कोसळधार पाऊस, दाट धुके आणि जगंल यामुळे ते वेगवेगळ्या दिशेला जाऊन भरकटले. सकाळी एकमेकांची शोधाशोध करताना बाळूचा गारठून मृत्यू झाल्याचे लक्षात आले. ही हृदयद्रावक घटना बघता ओतूर पोलिस व वन विभाग यांनी गडावर वाटेत पाऊलखुणा करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT