पुण्यात 'ट्री अ‍ॅम्ब्युलन्स'च्या माध्यमातून घेतली जाणार झाडांची काळजी  
पुणे

Tree Ambulance : पुण्यात 'ट्री अ‍ॅम्ब्युलन्स'च्या माध्यमातून घेतली जाणार झाडांची काळजी

झाडांच्या सवर्धनासाठी महापालिकेचा उपक्रम; पर्यावरणदिनी उपक्रमाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यात विविध करणांमुळे या झाडांची पडझड होत असते तर अनेक झाडांना मोठ्या प्रमाणात खिळे ठोकण्यात आल्याने ही झाडे टिकत नाहीत. यामुळे पुणे महानगरपालिका येत्या पर्यावरण दिनापासून शहरातील झाडांच्या आरोग्य संवर्धनासाठी ट्री अॅम्ब्युलन्स उपक्रम सुरू करणार आहे. उद्यान विभागासोबत हा उपक्रम शहरात राबवला जाणार असून या माध्यमातून शहरातील झाडांची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मंगळवारी (दि.१३) दिली.

पुणे शहरात झाडांची संख्या जास्त आहे. या झाडांमुळे पर्यावरणाचे संवर्धन होत आहे. मात्र, शहरातील काही झाडे तोडली जातात, तर काही झाडे वाऱ्यामुळे पडतात. झाडांचे योग्य संवर्धन झाले नसल्यामुळे झाडांच्या सुकण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. विविध कारणांमुळे शहरातील झाडांना खिळे देखील ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे देखील झाडांना मोठ्या प्रमाणात इजा पोहचत असल्याने पुणे महानगरपालिका झाडांच्या संवर्धनासाठी ट्री अॅम्ब्युलन्स उपक्रम सुरू करणार आहे. या ट्री अॅम्ब्युलन्समध्ये विविध प्रकारची उपकरणे ठेवली जाणार आहेत. झाडाचा बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. झाडांना खिळे असतील तर या अॅम्ब्युलन्समधील कर्मचारी झाडांना खिळेमुक्त करणार आहेत. यासाठी उद्यान विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे. सार्वजनिक झाडांबरोबर खासगी झाडांची देखील निगा राखली जाणार आहे. ५ जूनपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून पहिल्या १५ दिवसांत प्रधान्याने हा उपक्रम शहरात राबविला जाणार आहे. या मोहिमेत शहरातील विविध सामाजिक संस्थांनी देखील सहभाग घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.

झाडांच्या काळजीसाठी हेल्पलाइन तयार करणार

शहरातील झाडांचे संवर्धन करण्यासाठी हेल्पलाइन देखील तयार केली जाणार आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून नागरिकांनी आपल्या परिसरातील झाडांची माहिती दिल्यावर ट्री अॅम्ब्युलन्सद्वारे संबंधित झाडाची निगा राखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी पालिकेमार्फत कर्मचारी नेमले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT