पुणे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 109 अधिकार्‍यांच्या बदल्या रद्द

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनदी अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. यात 109 अधिकार्‍यांच्या बदल्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियम, निकषात न बसणार्‍या आहेत, असे कळवत त्या रद्द करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्ह्याचा शुक्रवारी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राज्य शासनाकडून बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम, निकषांचे पालन करण्यात आले नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या होत्या. तसेच अनेक अधिकारी आणि पोलीस अधिकार्‍यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहित लागू होण्यापूर्वी सनदी अधिकारी आणि राज्य पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. मात्र, अनेक बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम, निकष पाळण्यात आले नाहीत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या.

देशपांडे म्हणाले, मॅटने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करतानाचे नियम, निकष तपासून पाहण्याची विनंती केली होती. अशी 225 प्रकरणे आयोगाकडे दाखल झाली होती. या प्रकरणांची छाननी केल्यानंतर 109 बदल्या नियम, निकषानुसार झाल्या नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नियमाप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे.' जिल्हाधिकारीपदी डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, डॉ. दिवसे हे गेल्या काही वर्षांपासून पुण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT