Baramati Plane Crash Pudhari
पुणे

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान कोसळलं; गोजुबावी परिसरात अपघात, वैमानिक बचावला|Video

Baramati Plane Crash: बारामती तालुक्यातील गोजुबावी गावाजवळ रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली असून वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुढारी वृत्तसेवा

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील गोजुबावी गावाच्या हद्दीत रेडबर्ड कंपनीचे एक शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली असून, सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ही घटना सुमारे अर्ध्या तासापूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोजुबावी परिसरात प्रशिक्षण उड्डाण सुरू असताना अचानक शिकाऊ विमान कोसळले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर काही कारणांमुळे हा अपघात झाला का, याचा तपास सुरू होण्याची शक्यता आहे.

अपघातग्रस्त विमान हे रेडबर्ड कंपनीचे असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीमध्ये शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी रेडबर्ड आणि कार्वर एव्हिएशन या दोन प्रमुख संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत देशभरातील विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण दिले जाते.

विशेष म्हणजे, गोजुबावी परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याच भागात काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानालाही अपघात झाला होता. त्यामुळे या परिसरातील विमान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

यापूर्वीही रेडबर्ड कंपनीच्या शिकाऊ विमानांचे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. काही प्रकरणांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीच्या कामकाजावर निर्बंधही घालण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे पुन्हा एकदा झालेल्या या अपघातामुळे प्रशिक्षण प्रक्रियेतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या विमान कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, अधिकृत अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT