हडपसर: हडपसर परिसरातील ससाणेनगर येथे मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या ठिकाणी चिखल झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच, पादचार्यांना देखील विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
सांडपाणी वाहिनीची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम करणे गरजेचे आहे. मात्र, ठेकेदाराचे या कामाकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठेकेदार रस्ता दुरुस्ती कधी करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Latest Pune News)
सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी गेल्या महिन्यापासून दोन वेळा रस्ता खोदण्यात आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोडा साचला आहे. ऊन पडल्यानंतर या ठिकाणी धुळाचा त्रास सहन करावा लागत आहे, तर पाऊस झाल्यानंतर चिखलातून ये-जा करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामगारांची या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी वर्दळ असते. मात्र सध्या होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या रस्त्याची दाणादाण उडाली आहे. पाऊस पडल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यातच नवनाथ तरुण मंडळ चौकातील सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. हे सिग्नल फक्त नावालाच बसवले आहेत काय? असा सवाल दिलीप गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
या ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे. सांडपाणी वाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ससाणेनगर येथील रस्त्यावर होणार्या वाहतूक कोंडीबाबत काळेपडळ वाहतूक विभागाच्या अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. नवनाथ तरुण मंडळ चौकातील सिग्नल बंद असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.-मोहनलाल बलाई, रहिवासी, ससाणेनगर
सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी या रस्त्याची गेल्या महिन्यापासून खोदाई सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. महापालिका प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करावी.-श्रीधर देसाई, रहिवासी, ससाणेनगर
ससाणेनगर भागातील सांडपाणी वाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.- निखिल मोरे, कनिष्ठ अभियंता, हडपसर क्षेत्रीय कार्यालय