पुणे: हडपसर येथील मगरपट्टा चौकातील वाहतूक व्यवस्थेत महिन्यापूर्वी केलेल्या बदलामुळे पादचार्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. तसेच अपघात होण्याचा धोकाही नाकारता येत नाही. यामुळे विरुद्ध दिशेने येणार्या वाहनांवर कारवाई करावी आणि पादचार्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक, नागरिकांची गैरसोय होत आहे.
भरधाव वाहनांमुळे मगरपट्टा चौकातून नोबेल हॉस्पिटल, महादेव मंदिर आणि डॉ. राममनोहर लोहिया उद्यानाकडे जाताना पादचार्यांनी गैरसोय होत आहे. वेगाने येणार्या वाहनांमुळे त्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पादचार्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. (Latest Pune News)
मगरपट्टा चौकात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यामुळे या ठिकाणी वाहतूक वाहतूक पोलिस संख्या वाढवणे गरजेचे आहे. विरुद्ध दिशेने येणार्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी. मगरपट्टा चौकातून मुंढवामार्गे, सोलापूर, पुण्याकडे जाणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
मगरपट्टा चौकाजवळ मुंढवा आणि पुण्याहून येणारी वाहनांना ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी यूटर्न दिला आहे, त्या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मगरपट्टा चौक परिसरात उद्यान, हॉस्पिटल आणि शाळा असल्याने या ठिकाणी नागरिकांसह विद्यार्थ्यांची वर्दळ असते. या ठिकाणी वाहनांचा वेग जास्त असल्याने पादचार्यांना रस्ता ओलांडणे अवघड होत आहे. तसेच मुलांना शाळेत सोडताना आणि घरी आणताना पालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच या ठिकाणी सतत वाहतूका कोंडी आहे. यामुळे या ठिकाणी सतत वाहतूक पोलिस तैनात असणे गरजेचे आहे.-सुधीर मेथेकर, ज्येष्ठ नागरिक, हडपसर
मगरपट्टा चौकातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी येथील यूटर्न बंद केली आहे. यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.-धनंजय पिंगळे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग हडपसर