निरा: पुरंदर तालुक्यातील गुळूंचे आणि कर्नलवाडी गावच्या हद्दीत ॲसिडसदृश्य घातक रसायन माळरानावर सोडून पळून जाण्याच्या तयारीत असलेला टँकर कर्नलवाडी आणि गुळुंचे येथील तरुणांनी पकडला असून, त्याला जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जवळपास 30 टन वाहतूक क्षमता असलेल्या या टँकरमध्ये अर्ध्याहून अधिक रसायन शिल्लक होते. त्यामुळे आता या टँकर मालकासह चालकावर जेजुरी पोलिस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Pune News)
बुधवारी (दि. 24) रात्री 8 वाजताच्या सुमारास एक टँकर निरा-मोरगांव रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीत रसायन सोडताना कर्नलवाडी आणि गुळुंचे येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. यानंतर तेथील ग्रामस्थांनी या टँकरच्या चालकास व आणखी एकाला टँकरसह ताब्यात घेतले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.
यानंतर कर्नलवाडीचे पोलिस पाटील दिनेश खोमणे आणि ग्रामस्थांनी हा टँकर निरा पोलिस चौकीला आणून उभा केला. निरा पोलिसांच्या ताब्यात या दोघांना दिले असता, निरा पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार घनश्याम चव्हाण यांनी अधिक चौकशी केली.
टॅंकर मधून गरम घातक रसायन वाहतूक करणारे चालक रोहित अशोक साळुंखे (वय 33, रा. नवीन कवठे मसूर, जि. सातारा, तसेच ठेकेदार गौरव रामदास यादव (वय 28, रा. पारगाव खंडाळा, जि. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे निष्पन्न झाली.
रात्री 12 वाजता जेजुरीचे पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी हा टँकर ताब्यात घेऊन तो जेजुरी पोलिस ठाण्यात आणला. या दरम्यान गुळुंचे, कर्नलवाडी येथील 25 ग््राामस्थांनी या टँकरचालक व अशा प्रकारचे केमिकल सोडणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.