तळेगाव स्टेशन(पुणे) : मावळ तालुक्यातील इंदोरी आणि शेलारवाडीजवळील कुंडमळा हे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे अनेक पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येतात. परंतु, काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे दरवर्षी काही पर्यटकांचा जीव जात आहे. यामुळे या निसर्गरम्य, अल्हाददायक ठिकाणास गालबोट लागत असून कुंडमळ्याचे नाव निष्कारण खराब होत आहे.
पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडतात. या दुर्दैवी घटनांमुळे प्रशासनावरही ताण येतो. तसेच, काहीजण तेथील सांडव्यावरुन रिक्षा, चारचाकी वाहने नेतात. यामुळेही अपघात होत आहेत. अशा दुर्दैवी घटना घटना थांबविणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटकांनी दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच, कुंडमळ्यातील धोकादायक ठिकाणी कायमस्वरुपी लोखंडी कठडे बांधणे आवश्यक आहे. जेणेकरून पर्यटकांना तेथे जाताच येऊ नये. तसेच, अतिउत्साही पर्यटकांवर कारवाई केल्यास अशा घटनांवर जरब बसेल आणि दुर्दैवी घटनांना आळा बसेल.
इंद्रायणी नदीवर बंधारा असून त्यावरुन पाणी प्रचंड वेगात वाहते. यामुळे तेथे जाणे, सेल्फी काढणे धोकादायक असल्यामुळे त्या संदर्भातील फलक पोलिसांनी लावला आहे. तसेच, पोलिस बंदोबस्तही ठवला आहे. तरीही काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून नदीपात्र आणि रांजणखळग्याजवळ जातात. अतिउत्साहात, फाजील आत्मविश्वासात सेल्फी काढताना पाय घसरुन पाण्याच्या प्रवाहात पडून वाहत जातात आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. यामध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.
कुंडमळा येथील रांजणखळगे पाहताना पाण्यात उतरू नये. पाण्याचा प्रवाह प्रचंड असून अनेक ठिकाणी निसरडे झाले आहेत. त्यामुळे पाय घसरुन अपघात होऊ शकतो. वर्षाविहाराचा आनंद लुटताना नियमांचे पालन करावे.
– निलेश गराडे, संस्थापक वन्यजीव रक्षक संस्था मावळ
हेही वाचा