सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजालगतच्या अतिदुर्गम झुंजार बुरुजावरून 300 फूट खोल दरीत कोसळून अंदाजे वय 55 ते 60 वयाच्या पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली. मृताची ओळख पटविण्याचे काम राजगड पोलीस करत आहेत.
हा पर्यटक शनिवारी (दि. 26) सिंहगडावर फिरण्यासाठी आला होता. तो सायंकाळी 5 च्या सुमारास झुंजार बुरुजावरून खोल दरीत कोसळल्याचे गडावरील काही विक्रेत्यांनी पाहिले. मात्र, पोलिसांच्या भीतीमुळे याची खबर कोणाला दिली नाही. रविवारी सकाळी एक पर्यटक दरीत पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली.
त्यानुसार सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील यांच्यासह कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि राजगड, हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षारक्षक श्रीकांत लांघे, हर्षद गायकवाड, दीपक जोरकर, स्वप्निल सांबरे, दत्ता जोरकर, सुमीत रांजणे, राहुल जोरकर, नंदू जोरकर, रमेश खामकर, संतोष पढेर, घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेर, मावळा जवान संघटनेचे तानाजी भोसले, हवेली रेस्क्यू पथकाचे गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, सागर बावळे, संजय चोरघे, संजय कडू पाटील, मनोज शिंदे, प्रतीक महामुनी यांनी खोल दरीतून पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढला.
त्यानंतर हवेली पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष तोडकर, साळुंखे आदींनी तो गडाच्या वाहनतळावर आणला. घटनास्थळ राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने मृतदेह राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. राजगड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
दुर्गम बुरुजावरून खोल दरीत कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच नेमका कधी व कोणत्या कारणाने मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट व तपकिरी रंगाची पॅन्ट असून, हातात घड्याळ आहे, असे हवेली हवालदार तोडकर यांनी सांगितले.