शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यासोबत जुन्नर तालुक्यात देखील तापमानाचा पारा 40-42 अंशांवर जाऊन पोहचला असून, तापलेल्या सूर्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. याचा मोठा परिणाम राज्यातील पहिल्या पर्यटन तालुक्यातील पर्यटनाला देखील बसला आहे. जुन्नर तालुक्यातील नेहमी गजबजलेली पर्यटन केंद्रे किल्ले शिवनेरीसह बहुतेक सर्व गडकिल्ल्यांकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्याने स्थानिक हॉटेल, पर्यटन केंद्र, व्यावसायिकांना फटका बसला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात उन्हाने कहर केला आहे. कृषिप्रधान असलेल्या जुन्नर तालुक्यात देखील उन्हाचा पारा एवढा वाढला आहे, की जिवाची लाहीलाही झाली आहे. तीव्र उन्हामुळे बाहेर पडणेही दुरापास्त झाले आहे. उन्हाचा पारा 40 च्या पुढे गेल्याने जुन्नरच्या बहुतेक पर्यटन केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जुन्नर तालुक्यात असलेले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, अष्टविनायक गणपतीपैकी दोन स्थळे लेण्याद्री आणि ओझर, अनेक पांडवकालीन लेण्या, ट्रेकिंग करणार्यांची पंढरी हरिश्चंद्रगडासह अनेक गड-किल्ल्यांचा वारसा असलेली सर्व पर्यटन केंद्रे दर वर्षी उन्हाळ्यात देखील पर्यटकांनी गजबजलेली असतात. राज्यासह देशभरातील पर्यटक नेहमीच जुन्नर तालुक्यातील या पर्यटन केंद्रांना भेटी देतात. मात्र, उन्हाचा पारा वाढल्याने अनेक कुटुंबे पर्यटनासाठी घराबाहेर पडायला तयार नाहीत. याचा परिणाम हॉटेल व्यावसायिक, कृषी पर्यटन केंद्र, लॉजिंगसह सर्वच लहान-मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला आहे.
दर वर्षी शाळांना उन्हाळी सुटी लागली की पालक, पर्यटक मोठ्या प्रमाणात आपल्या मुला-मुलींना शिवनेरी किल्ल्यावर घेऊन येतात. याशिवाय इतर पर्यटन ठिकाणांना भेट देण्यासाठी येतात. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून पर्यटकांची गर्दी प्रचंड कमी झाली आहे. माझे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मोरे मिसळ हॉटेल असून, पर्यटकांची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम माझ्यासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे.
– अजित मोरे, हॉटेल व्यावसायिक
यंदा उन्हाळा खूपच कडक आहे. त्यामुळे दिवसाचे ट्रेकिंग मंदावले आहे. महाराष्ट्रातील ट्रेकिंग, दुर्गभ—मंती हंगामाची ही अखेर आहे. थोड्याफार प्रमाणात नाइट ट्रेकिंग सुरू आहे. मेमध्ये याचे प्रमाण अजून कमी होईल. दुर्गभ—मंतीचा नवा हंगाम जूनपासून सुरू होईल. मात्र, 1 जून ते 15 ऑगस्ट हा काळ सह्याद्रीच्या मुख्य गाभ्यात, घाट व डोंगरकपार्यांत अतिशय धोकादायक व नैसर्गिक आपत्तींचा आहे. याच काळात भूस्खलन, दरडी, झाडे व विजा कोसळणे, नदी-ओढ्यांना पूर यातून दुर्घटना होतात. सुरक्षित पर्यटनासाठी थोडा संयम ठेवून श्रावणात निसर्ग स्थिर झाल्यावर वर्षा पर्यटनापासून सुरुवात करावी.
– नीलेश खोकराळे, अध्यक्ष, शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, जुन्नर
हेही वाचा