बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रविवार (दि. 8) हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे रविवारी बारामतीत असून, त्यांच्या उपस्थितीत बैठकीचेही आयोजन केले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारपासूनच बारामतीत तळ ठोकून आहेत.
खा. सुप्रिया सुळे याही परदेश दौर्यानंतर रविवारी बारामतीत येत आहेत. त्यामुळे रविवारी होणार्या घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ही निवडणूक लढवणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्याचा फैसला रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीत केला जाईल. (Latest Pune News)
या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. यासंबंधी खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. ती रविवारी होण्याची दाट चिन्हे आहेत.
गोविंदबागेत पवार यांच्या उपस्थित बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या प्रमुखांची सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. विविध कार्यक्रमांनिमित्त खा. सुळे या रविवारी बारामतीत असणार आहेत. गोविंदबागेतील बैठकीला युगेंद्र पवार हेही उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक आम्ही सर्वपक्षीय म्हणून लढवू, असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यांनी स्वतःच ‘ब’ वर्ग गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाय मी संचालक मंडळात असेन, असेही स्पष्ट केले आहे.
‘माळेगाव’च्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात श्री नीलकंठेश्वर पॅनेलने जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. स्वतः उपमुख्यमंत्री शनिवारपासून बारामतीत तळ ठोकून आहेत. रविवारीही ते कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामतीत असतील. शनिवारी काही इच्छुकांनी तिकिटासाठी त्यांची भेटही घेतली; परंतु उपमुख्यमंत्र्यांनीही अद्याप आपल्या पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
सहकारातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे हे सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘माळेगाव’ची निवडणूक होईल की बिनविरोधचा प्रस्ताव पुढे येईल, हे सध्या तरी सांगणे अशक्य झालेले आहे. छत्रपती सहकारी साखर काखान्याप्रमाणे ऐनवेळी काही तोडगे निघू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष निवडणुकीला सामोरे जातो की नाही, हेही अद्याप समोर आलेले नाही. रविवारी त्यासंबंधी अंतिम निर्णय होईल.
राष्ट्रवादीच्या सलगीकडे लक्ष
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 593 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 12 जूनपर्यंत मुदत आहे. या मुदतीचा कालावधी प्रचार कालावधीपेक्षा दुप्पट ठेवला गेला आहे. परिणामीष सध्या सगळेच पॅनेल समोरच्याच्या ताकदीचा अंदाज घेत आहेत.
अजूनही पाच दिवसांचा वेळ हातात असल्याने पडद्यामागे काही घडामोडी घडू शकतात. एखादा गट दुसर्या गटाला पाठींबा देऊ शकतो. दोन्ही राष्ट्रवादीत गेल्या दोन महिन्यांपासून राज्यपातळीवर सलगी दिसून, आली आहे. बारामतीत काय घडणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.