पुणे : सध्याच्या चित्रपटांतून साहित्य हरविले आहे, म्हणून त्याच त्याच प्रकारचा आशय असणारे चित्रपट तयार होत असून, त्यात नवीन काही येत नाही, अशी खंत तमीळभाषक लेखक आणि चित्रपट पटकथाकार बी. जेयामोहन यांनी बुधवारी (दि. 22) व्यक्त केली. 24 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बी. जेयामोहन हे विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ‘कादंबरी ते चित्रपट’ या विषयावर बोलत होते. त्यांचा ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी परिचय करून दिला.
महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. सध्याच्या चित्रपटांबद्दल बोलताना बी. जेयामोहन म्हणाले, सध्याचे चित्रपट हे दुसऱ्या चित्रपटांवर आधारित असतात. त्यातून साहित्य हरविलेले आहे. म्हणून चित्रपटातील विषय हे तेच तेच असतात. पाच ते सहा आशयसूत्र सगळीकडे समान दिसते. एका चित्रपटात तर ते पाच-सहा आशयसूत्र एकाच वेळी घेण्यात आले होते.
कादंबरीविषयी बी. जेयामोहन म्हणाले, ‘कादंबरीमध्ये कलात्मक आणि व्यावसायिक असे दोन प्रकार असतात. कलात्मक कादंबरीमध्येही तीन प्रकार असतात. त्यात अभिजात, आधुनिकतावादी आणि आकृतिबंद नसलेल्या कादंबऱ्या असतात. अभिजात कादंबरीमध्ये तत्त्वज्ञात्मक चर्चा असते आणि त्या संस्कृतीचे यथार्थ चित्रण करतात. हा खूप उच्च दर्जाचा प्रकार आहे. आधुनिकतावादी कादंबरी ही व्यक्तिवादी असते. त्यात एका व्यक्तीभोवती फिरणारे कथानक असते. त्यात व्यक्ती, विरोधाभास असतो, ज्या चित्रपटासाठी उपयुक्त असतात. आकृतिबंद नसलेल्या कादंबऱ्यांमध्ये तुटक वाक्य, व्यक्तिमत्त्व आणि मानसिकता रेखाटलेली असते. कलात्मक या मोठ्या कादंबऱ्या चित्रपट तयार करण्यासाठी उपयुक्त नसतात. आकृतिबंद नसलेल्या कादंबऱ्याही चित्रपटासाठी उपयुक्त नसतात. मात्र, आधुनिकतावादी आणि व्यावसायिक स्वरूपाच्या कादंबऱ्या या चित्रपटासाठी उपयुक्त असतात. व्यावसायिक कादंबऱ्या या पूर्ण नसतात. मात्र, त्यातून उत्तम दिग्दर्शक, चांगला चित्रपट तयार होऊ शकतो.’
पुणे फिल्म फाउंडेशन, राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या (दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई) वतीने आयोजित 24 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप गुरुवारी (दि. 22) आज होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. आशिष शेलार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना ‘पिफ डिस्टींग्वीश ॲवार्ड’, तर ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार अमर हलदीपूर यांना संगीतकार एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच, महोत्सवातील पुरस्कार वितरणही होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
कादंबरीतून आशय थेट न घेता तुमचे स्वतःचे कथासूत्र तयार करा. कादंबरीत असलेले संवाद वापरू नका, नवे आणि छोटे संवाद लिहा. हे लक्षात घेतले पाहिजे की, चित्रपटात दृश्ये महत्त्वाची असतात, संवाद नाही. कादंबरीमधील विशद केलेली तत्त्वज्ञात्मक चर्चा घेऊ नका. चित्रपटात परिणामकारक दृश्य महत्त्वाची असतात, त्यादृष्टीने पटकथा लिहाव्यात. पटकथा लिहिताना संपूर्ण कादंबरीचा आशय घेतला पाहिजे. कादंबरीमधील मुख्य पात्र घेऊन आणि त्यातील नाट्य घेऊन पटकथा तयार केली पाहिजे, असे बी. जेयामोहन यांनी सांगितले.